दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : 'स्टेट बँक ऑफ इंडिया'ने मागील आठ वर्षांपासून सुरू असलेले ग्राहक सेवा केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं राज्यातील ५०० तरुणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. बँकेच्या या मनमानीविरुद्ध या तरुणांनी मुंबईत तीन वेळा आंदोलन केलं, स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे खेटे घातले, पण त्यांच्या पदरी निराशा पडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याच्या ग्रामीण भागातून मुंबईत आलेले स्टेट बँकेचे ग्राहक सेवा केंद्र चालवणारे चालक... ३१ मार्च २०१८ रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाने देशभरातील ग्राहक सेवा केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ आली आहे. राज्यातील दुर्गम ग्रामीण भागात स्टेट बँकेच्या सेवा पुरवण्याचं काम ग्राहक सेवा केंद्रातर्फे हे तरुण मागील आठ वर्ष करत होते. निराधार, अपंग, निरक्षर लोकांपर्यंत बँकिंग सेवा पोहचवणारी ही ग्राहक सेवा केंद्र 'स्टेट बँक ऑफ इंडिया'नं अचानक बंद केली आहेत. 


एका ग्राहक केंद्रावर २५ हजार ग्राहकांची खाती उघडण्यात आली होती. त्यामुळे या ग्राहकांचं काय होणार? हाही प्रश्न आहे. दुसरीकडे आठ वर्ष काम केल्यानंतर आता या तरुणांचं नोकरीचं वय निघून गेलंय त्यामुळे त्यांना दुसरीकडे नोकरी लागण्याची शक्यताही कमीच आहे. आपल्यावरील या अन्यायाच्या निषेधार्थ या ग्राहक सेवा चालकांनी तीन वेळा मुंबईत उपोषण केलं, पण बँकेनं उपोषणाची दखल घेतली नाही. त्यामुळे आता न्याय मिळाला नाही तर कुटुंबासह मुंबईत आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिलाय.