जयेश जगड, झी मीडिया, अकोला : सायकल...कधीकाळी भारतीय समाज जीवनाचा अविभाज्य भाग असलेला घटक..मात्र पुढे काळ बदलला अन् मोटारसायकल आणि चारचाकीच्या आगमनानं हीच सायकल अडगळीत पडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या उपेक्षित असलेल्या याच सायकलला श्रीमंती अन् सन्मान देणार एक सोहळा अकोटमध्ये पार पडला..नखशिखांत सजणं कशाला म्हणतात ते या सायकलींना पाहून समजंयत. सायकलच्या हँडलपासून सीट, पैडल, चाकं, स्पोकसह प्रत्येक पार्ट सजला होता. 


सायकलला सौंदर्यवती बनविणा-या या शोमध्ये 47 स्पर्धकांनी घेतली. अकोट शहर गेल्या दशकभरात नावारूपाला आलंय ते दरवर्षी येथे आयोजित होणा-या प्राणी आणि इतर बाबींच्या हटके फॅशन शोमुळे...अकोट जेसीआय या सामाजिक संघटनेनं हे हटके आयोजन केलं होतं. 


या शोमध्ये अगदी भाजीवाल्या बाईपासून राजाबाबू, दादा कोंडके, पोष्टमन, शेतकरी, वारकरी, पोलीस आणि सैनिक असे सर्वच सहभागी झाले होते. या सर्वांनी रॅम्प वॉक करत सायकलंच महत्त्व पटवून दिलं. यामध्ये पर्यावरण रक्षण, इंधन वाचवा, स्त्रीभ्रूण हत्या विरोध, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी अशा सर्व विषयांवर भाष्य करण्यात आलं. 


हा आगळा-वेगळा फॅशन शो पाहण्यासाठी अकोटकरांनी चांगलीच गर्दी केली होती. या फॅशन शोच्या निमित्तानं पुन्हा एकदा सायकलला प्रतिष्ठा मिळायला सुरूवात झाली तर या शोचं फलीतच म्हणावं लागेल.