येवल्यातल्या जंगलातील काळवीट-हरिण पाहण्यासाठी सायकल ट्रॅक
नाशिक जिल्ह्यात येवल्यामधील जंगलामध्ये असणाऱ्या काळवीट आणि हरणांना पाहण्यासाठी आता सायकल ट्रॅक सुरु करण्यात आला आहे.
नाशिक : नाशिक जिल्ह्यात येवल्यामधील जंगलामध्ये असणाऱ्या काळवीट आणि हरणांना पाहण्यासाठी आता सायकल ट्रॅक सुरु करण्यात आला आहे. ममदापुर राजापूर परिसरात वनविभागाच्या वतीने चार गावांमध्ये एकुण २२ किलोमिटर अंतराचे सायकल ट्रॅक सुरु केले आहेत.
शासनाने संरक्षीत वन्यप्राणी म्हणून घोषित केलेल्या काळविटांसह हरणांची जास्त संख्या असलेल्या ममदापूर वनसंवर्धन प्रकल्पामध्ये काळविटे, हरणांना पाहण्यासाठी सुरु केलेल्या सायकल ट्रॅकमुळे पर्यटकांची चांगलीच सोय होणार आहे.
सायकलमुळे पर्यावरणपुरक पर्यटन होणार आहे. राजापूर, ममदापूर, देवदरी, खरवंडी अश्या ४ गावांमध्ये ट्रॅक उभारण्यात आलाय. या गावांमध्ये एका समितीच्या माध्यमातून पर्यटकांसाठी अल्प दरात भाड्याने सायकली पुरवण्यात येणार आहेत. तसेच येणाऱ्या पर्यटकांच्या राहण्याची, जेवणाची सोय ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिलेल्या जागेत होणार आहे.
ममदापूर वनसंवर्धन प्रकल्पाच्या जंगलामध्ये हरणे, काळविट बघण्यासाठी पुर्वी चांगला रस्ता नसल्याने पर्यटकांचे हाल होत होते. सायकल ट्रॅकमुळे जगंलामध्ये अत्यंत आतपर्यंत जाऊन हरणे, काळविटांच्या कळपांना बघण्याचा आनंद घेता येत आहे. येवल्यातला हा प्रयोग नक्कीच कौतुकास्पद आहे. राज्यातील इतर ठिकाणीही अशी सोय व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होतेय.