मुंबई : कोरोना व्हायरसशी साऱ्या देशाचा लढा सुरु असतानाच इथं महाराष्ट्र आणि विशेष म्हणजे मुंबईवर एक नवं संकट घोंगावत असल्यामुळं नागरिकांसह प्रशासनापुढं बऱ्याच अडचणी उभ्या राहिल्या आहेत. महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर निसर्ग नावाचं चक्रीवादळ धडकणआर असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवल्यामुळं सर्वच स्तरांतून आता या वादळाला तोंड देण्यासाठीचे मार्ग अवलंबात आणले जात आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एनडीआरएफच्या तुकड्यायही मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी अशा भागांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. सावधगिरीचा इशारा म्हणून अनेक ठिकाणी नागरिकांचं स्थलांतरही करण्यात आलं आहे. मच्छीमारांनाही पुढील काही दिवसांसाठी मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन तर सज्ज आहेच. पण, सर्वसामान्य नागरिकांनीही सतर्क राहत काही गोष्टींचं पालन करणं गरजेचं आहे. 


काय करावं आणि काय करु नये? 


-विजेच्या उपकरणांचा वापर करणं शक्यतो टाळा. 


-महत्त्वाची कागदपत्र, दागिने वगैरे वस्तू प्लास्टिकच्या पिशवीत बांधून ठेवा. 


-विद्युत उपकरणांची तपासणी करुन ठेवा. 


-मोबाईल, पॉवरबँक, बॅटरीवर चालणाऱ्या विजेऱ्या चार्ज करुन ठेवा. 


-माध्यमांमध्ये दिल्या जाणाऱ्या अधिकृत वृत्तांवर लक्ष ठेवा. 


-दूरदर्शन, आकाशवाणीवरुन हवामान खात्यातर्फे दिल्या जाणाऱ्या निर्देशांचं पालन करा. 


-पिण्याचं स्वच्छ पाणी साठवून ठेवा. 


-घराच्या काही खिडक्या बंद ठेवा, तर काही उघड्या ठेवा. 


-मोठं छत असणाऱ्या ठिकाणी जाणं टाळा. सोबतच डोकं आणि मानेच्या संरक्षणासाठी हातांचा वापर करा. 


-घराबाहेर जाणं टाळा 


-जुन्या किंवा मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये जाणं टाळा 


-तुम्ही राहत असणारं घर काही कारणास्तव धोक्यात असल्याची शंका येताच तिथून वेळ हाती असतानाच दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत व्हा. 


-अफवांवर विश्वास ठेवू नका, अफवा पसरवू नका. 


-गॅस पाईपलाईन, सिलेंडर तपासून पाहा. 


आपात्कालीन किट सोबत बाळगा 


निसग्र चक्रीवादळाची एकंदर तीव्रता आणि त्या धर्तीवर देण्यात आलेली धोक्याची सूचना पाहता नागरिकांना सातत्यानं सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे. शिवाय संकटाच्या वेळी काही गोष्टी सोबतच असाव्यात या कारणास्तव आपात्कालीन किटसुद्धा बाळगण्यासा सल्ला देण्यात आला आहे. 


आपात्कालीन किटमध्ये नेमकं काय असेल? 


-बॅटरीवर चालणारी विजेरी (टॉर्च)


-जास्तीच्या बॅटरी, पॉवर बँक


-प्रथमोपचारासाठीची औषधं, सुरी, दोरखंड, बूट, 


-महत्त्वाची कागदपत्र (रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे) 


-हाताशी काही पैसे सोबत बाळगा 


-खाण्याचे सुके पदार्थ, पिण्याचं पाणी 


-एका हवाबंद डब्यात मेणबत्ती आणि माचिस ठेवा 


 


चक्रीवादळाचं हे संकट मोठं असलं तरीही नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करत या संकटाच्या काळावरही मात करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.