रायगड : वायू चक्रीवादळामुळे रायगड किनारपट्टीवर देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील २ दिवस सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. 12 आणि 13 जून हे दोन दिवस धोक्याचे असून उत्तर रायगडात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. समुद्र खवळलेला राहणार असून 6 मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मच्छिमार, पर्यटक, नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वायू चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्यावर धडकण्याचा अंदाज आहे. १४५ ते १५५  किमी प्रति तासाच्या वेगाने हे चक्रीवादळ पुढे सरकतं आहे. चक्रीवादळ येण्याआधीच तापीच्या बालोदमध्ये जोरदार वारे वाहत असल्यामुळे घरांची छतं उडून गेली आहेत. दुचाकी उलटल्या आहेत. जोरदार वाऱ्यामुळे मोठं नुकसान याठिकाणी झालं आहे. चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपत्कालीन बैठक बोलावली आहे. 



खबरदारीचा उपाय म्हणून गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावरील तब्बल तीन लाख लोकांचं सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे. या वादळाचा सर्वात मोठा फटका सौराष्ट्र आणि कच्छला बसण्याची भीती आहे. कच्छ, मोर्बी, जामनगर, जुनागड, द्वारका, पोरबंदर, राजकोट, अमरेली, भावनगर आणि गिर-सोमनाथ या जिल्ह्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.