Dahi Handi 2023 : राज्यभरात गुरुवारी मोठ्या उत्साहात गोपाळकाल्याचा (Dahi Handi) सण साजरा करण्यात आला आहे. ‘बोल बजरंग बली की जय’ म्हणत भल्यापहाटे घराबाहेर पडलेल्या गोविंदांनी मोठे थर लावत हंड्या फोडल्या आहेत. मात्र बुलढाण्यात या सणाला गालबोट लागलं आहे. बुलढाण्यातील (Buldhana) देऊळगाव राजा येथे गॅलरी कोसळून झालेल्या अपघातात एका मुलीचा मृत्यू झाला आहे. दहीहंडीच्या कार्यक्रमावेळी भिंत कोसळून एका मुलीचा मृत्यू झाला तर मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तर मुंबईत एकून 195 गोविंदा जखमी झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई ठाण्यात उंच दहीहंडी फोडण्यासाठी पथकांमध्ये चुरस लागली होती. तर बुलढाण्यात दहीहंडी पाहत असताना एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा शहरातील मानसिंगपुरा येथे संध्याकाळी आठ वाजता ही घटना घडली आहे. दहीहंडीची एका बाजूची दोरी भिंतीमधील गॅलरीला बांधलेली होती. त्या दोरीला काही तरुण दहीहंडी फोडण्यासाठी लटकले तेव्हा भिंत कोसळली. या घटनेत दोन मुलींचा खाली कोसळल्या. त्यातील निदा रशीद खान पठाण या चिमुकलीचा मृत्यू झाला. तर अल्फिया शेख हफीज ही 9 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे.


दुसरीकडे, मुंबईत दहीहंडी फोडताना यावर्षी 195 गोविंदा जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर काहींवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दिवसरात्र सराव करुनही उत्साहाच्या भरात काही गोविंदा जखमी झाले आहेत. गोपाळकाल्याचा दिवस उजाडल्यापासूनच मुंबईत मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली होती. या पावसामुळे थर रचताना गोविंदांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मैदानांमध्ये चिखल झाल्यामुळे दहीहंडी फोडण्यासाठी थर रचताना पथकांसमोर अडचणी येत होत्या. 


मुंबईतील जखमी गोविंदांची आकडेवारी


केईएम रुग्णालय -31 दुखापत (07 दाखल, 23 उपचाराधीन, 1 डिस्चार्ज)
सायन रुग्णालय -07 जखमी (डिस्चार्ज)
नायर रुग्णालय -03 जखमी (डिस्चार्ज)
जे जे हॉस्पिटल -03 जखमी (डिस्चार्ज)
सेंट जॉर्ज हॉस्प -03 जखमी (डिस्चार्ज)
जीटी रुग्णालय - 02 जखमी (ओपीडी, डिस्चार्ज)
पोद्दार हॉस्पिटल-16 जखमी (6 उपचाराधीन, 10 डिस्चार्ज)
बॉम्बे हॉस्पीटल-1 जखमी (उपचार चालू)


राजावाडी रुग्णालय- 10 जखमी (02 अॅडमिट, 08 डिस्चार्ज)
एमटी अग्रवाल हॉस्पिटल- 01
वीर सावरकर रुग्णालय- 01
शतब्दी हॉस्पीट-3 इंजरेड (1 उपचाराधीन, 2 डिस्चार्ज्ड)


वांद्रे भाभा रुग्णालय-3 जखमी (1 दाखल, 2 डिस्चार्ज)
व्ही एन देसाई रुग्णालय- 4 जखमी (डिस्चार्ज)
कूपर हॉस्पिटल- 06 जखमी (2 दाखल, 4 डिस्चार्ज)
भगवती रुग्णालय- शून्य
ट्रुमा केअर हॉस्पिटल- 4 जखमी (डिस्चार्ज)
BDBA रुग्णालय- 9 जखमी (1 दाखल)