प्रणव पोळेकर, झी २४ तास दापोली : शेक्सपियर नावात काय आहे? असं म्हणाला होता, पण निवडणुकीत नावात सगळं काही असतं. त्यामुळे आपल्या विरोधकांच्या नावाचे उमेदवार उतरवण्याचा रायगड पॅटर्न नेहमी वापरला जातो. राजकारणात हमखास जिंकण्यासाठी आपली मतं वाढवण्या इतकच आपल्याविरोधात पडणाऱ्या मतांचं जास्तीत जास्त विभाजन करण्याचा फंडा वापरला जात आहे. त्यासाठी विरोधी उमेदवाराच्या नावाशी साधर्म्य असलेल्या उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरवून मतदारांना गोंधळात टाकण्याची खेळी प्रत्येकवेळी खेळली जाते. यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादीने ही पद्धत अवलंबल्याचं दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेच्या योगेश कदम यांच्या नावाशी साधर्म्य असलेले योगेश दीपक कदम असा एक अर्ज दाखल झाला आहे. तर राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संजय कदम यांचं नाव धारण करणारे संजय दगडू कदम, संजय सीताराम कदम, संजय संभाजी कदम असे तिन्ही जण रिंगणात उतरले आहेत.


नावात साधर्म्य असलेले उमेदवार उभे करायचे याची सुरुवात रायगडपासून झाली. रायगडमध्ये तब्बल ८ मिनाक्षी पाटील नावाचे उमेदवार उभे करण्यात आले होते आणि त्यावेळी मिनाक्षी पाटील यांचा पराभव करण्यात आला होता. दापोली मतदारसंघात हा रायगड पॅटर्न पुन्हा वापरण्यात आला आहे. मतदारांना चकवण्याचा हा रायगड पॅटर्न कोकणात खास लोकप्रिय आहे. यंदाची निवडणूकही त्याला अपवाद नाही.