Video : `प्रत्येकाच्या आयुष्याची स्टोरी आहे, पण...`; दर्शना पवारचं शेवटचं प्रेरणादायी भाषण होतंय व्हायरल
Darshana Pawar Murder Case : राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी दर्शनाचा मृतदेह सापडला होता. दर्शनाच्या शरीरावर गंभीर जखमा असल्याचे आढळून आल्याने तिची हत्या झाल्याचे पोलिसांनी प्राथमिक तपासात सांगितले होते. त्यानंतर आता पोलिसांनी राहुल हांडोरेला अटक केली आहे.
Darshana Pawar Murder Case : एमपीएससी (MPSC) परीक्षेत राज्यात तिसऱ्या आलेल्या दर्शना पवार (Darshana Pawar) या तरुणीच्या हत्येने राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे. राहुल हांडोरे याने दर्शना पवार हिची निर्घृण हत्या करुन तिचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी फेकून दिला होता. दर्शनाची हत्या झाल्याचे समजताच पवार कुटुंबियांच्या पायाखालची जमिनच सरकली. इतके दिवस आपली मुलगी फक्त हरवली असल्याचे त्यांना वाटत होते. मात्र दर्शनाची हत्या झाल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ज्या सत्काराच्या कार्यक्रमासाठी दर्शना पुण्यात आली होती त्याचा व्हिडीओ (Darshana Pawar speech) आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
दर्शना पवारची वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर तिचा पुण्यातील स्पॉटलाईट अॅकॅडमीमध्ये सत्कार झाला. त्यानंतर दर्शना पवारने एक भाषण केलं होतं. दर्शनाच्या त्या शेवटच्या भाषणाचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. "प्रत्येकाच्या आयुष्याची एक स्टोरी आहे. पण ती ऐकण्यासाठी लोक तेव्हाच उत्सुक असतात जेव्हा ती यशस्वी असते. माझ्या घरामध्ये माझ्या आईवडिलांनी कधीच सांगितले नाही की तू हे करु नाही शकत. आपण शाळा, कॉलेजमध्ये चांगला परफॉर्मन्स करतो. पण आज एवढा सत्कार होतोय, इतके लोकं आपल्याशी बोलताय, ते आपल्या मुलींना घेऊन येतात. बोलतात की सांग कसा अभ्यास केला पाहिजे. ती गोष्टी साध्य केलेली असते ना, त्यात खूप लोकांचा हात असतो. जेव्हा आपण अपयशी ठरतो ना, ते आपले दोष असतात की, आपण अभ्यास कमी केला असेल, आपण डायव्हर्ट झालो असेल. पण जेव्हा आपण यशस्वी होतो ना, तेव्हा त्यामागे खूप लोकांची मेहनत असते. माझ्या घरामध्ये मला आई-वडिलांनी कधीच सांगितलं नाही की, तू हे नाही करु शकत. त्यांना खूप आत्मविश्वास आहे. त्यात त्यांचा महत्वाचा रोल आहे. ते नेहमी मला पुश करत असतात. त्यामुळे मी सर्व माझ्या कुटुंबाचे, माझ्या मित्र, मैत्रिणींचे खूप खूप आभार मानते," असे दर्शना आपल्या शेवटच्या भाषणात म्हणाली होती.
दर्शना पवार ही अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव तालुक्यातील होती. सर्व सामान्य कुटुंबातील दर्शना हुशार होती. मोठ्या मेहनतीने दर्शनाने परीक्षा पास केली होती आणि राज्यात ती तिसरी आली होती. सत्कार समारंभासाठी दर्शना पुण्यात आली होती. मात्र त्याचवेळी आरोपी राहुल हांडोरेने ट्रेकिंगच्या बहाण्याने दर्शनाला राजगडावर नेले आणि तिची हत्या केली. हत्येनंतर पावणे अकराच्या सुमारास राहुल खाली आला आणि त्याने तिथून पळ काढला. अनेक राज्यांमधून तो पळत होता. शेवटी अंधेरीमध्ये त्याला अटक करण्यात आली.