Dasara Melava 2025 Sanjay Raut: नवरात्री अगदी काही दिवसांवर आलेली असतानाच यंदाच्या नवरात्रीनंतर होणाऱ्या दसऱ्या मेळाव्यांची आतापासूनच चर्चा सुरु आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दसरा मेळाव्यांना विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना विरुद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना या दोन्ही पक्षांच्या दसरा मेळाव्यांवरुन मागील काही वर्षांपासून वाद होताना दिसत आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींबरोबरच या मेळाव्यांच्या आयोजनापासूनच ते चर्चेत असतानाच आता ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी दसरा मेळाव्यावरुन मुख्यमंत्री शिंदेंच्या पक्षाला टोला लगावला आहे. 


भीक मागवण्याचा उल्लेख करत टीका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरेंनी नागपूरमध्ये रविवारी झालेल्या पक्षाच्या जाहीर सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्य सरकारवर निशाणा साधला. या टीकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन पोस्ट करत ठाकरेंवर कठोर शब्दांमध्ये टीका केल्याचं पाहायला मिळालं. या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली. "काही नेते हताश आणि हरलेल्या मानसिकतेने संघटना चालवत आहेत हे पुन्हा एकदा सिध्द झालं. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करा या मागणीसाठी हातात कटोरा घेऊन दिल्लीचे उंबरे झिजवणे, ही भीक असते," असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा थेट उल्लेख न करता आपल्या ट्वीटर पोस्टमधून लगावला.


मोदी-शाहांची भांडी घासायला कोण गेलं होतं?


शिंदेंनी केलेल्या या टीकेवर उत्तर देताना राऊत यांनी, "कटोरे घेऊन दिल्लीच्या दरबारात, गुजराती व्यापारी मंडळाच्या दरबारात गेले अनेक वर्षांपासून कोण आहे? उद्धव ठाकरेंचं जे काही असेल ते आम्ही पाहून. गुजरातच्या दरबारात अडीच वर्षांपूर्वी सुरतला मोदी-शाहांची भांडी घासायला कोण गेलं होतं? मोदी-शाहांची धुणी-भांडी करायला कोण गेलं होतं? तुम्हीच गेला होता, मुख्यंत्रीपदासाठी," असं म्हणत निशाणा साधला.


नक्की वाचा >> केंद्र सरकारची काही जबाबदारी आहे की नाही? 'लाडकी बहीण'वरुन तिजोरीचा उल्लेख करत राऊतांचा सवाल


सुरत किंवा गुवहाटीला दसरा मेळावा घ्या


पुढे बोलताना राऊत यांनी, "मी कालच म्हणालो, तुम्ही दसरा मेळावा घेणार असाल तर मुंबईत घेऊ नका. गुजरातला घ्या. जिथे त्यांच्या शिवसेनाचा जन्म झाला आहे. त्यांच्या पक्षाला अडीच वर्ष झालं आहे. दोन जागा आहेत जिथे हे दसरा मेळाव घेऊ शकतात. एक तर सुरत नाहीतर गुवहाटीमध्ये कामाख्या मंदिरासमोर जिथे ते रॅडिसन हॉटेलमध्ये एक महिना बसून होते तिथे घेता येईल मेळावा. त्यांचा दसरा मेळावा या दोनपैकी एकाच ठिकाणी घ्यावा. सुरत सर्वात उत्तम आहे," असं उपहासात्मक विधान राऊतांनी केलं.