Ajit Pawar On Why He Supported BJP: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडून 9 महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका पत्रामधून राज्यातील जनतेला त्यांनी वेगळी भूमिका का घेतली यासंदर्भातील खुलासा केला आहे. अजित पवारांच्या अधिकृत एक्स (ट्वीटर) अकाऊंटवरुन केलेल्या पोस्टमध्ये एक पत्र त्यांनी शेअर केलं असून त्यामध्ये 10 मुद्द्यांमध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यापैकी एका मुद्द्यात त्यांनी आपण सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय का घेतला याबद्दल सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. अजित पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ते भविष्यातील भूमिकेपर्यंत अनेक मुद्दे या पत्रात मांडलेत.


दिलं भाजपाबरोबर जाण्याचं कारण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यासोबत जाताना वेगळा विचार केला, त्याबाबत अनेक माध्यमांतून विविध प्रकारे आजही चर्चा होत आहे. याविषयीची माझी नेमकी भूमिका राज्यातील सन्माननीय नागरिकांपर्यंत पोहोचावी या उद्देशानं केलेला हा पत्रप्रपंच," अशी कॅप्शन देत अजित पवारांनी एक पत्र शेअर केलं आहे. या पत्रातील दुसऱ्या, तिसऱ्या आणि पाचव्या मुद्द्यामध्ये अजित पवारांनी भारतीय जनता पार्टीसोबत जाण्याच्या निर्णयाबद्दल भाष्य केलं आहे.


...म्हणून वेगळी भूमिका घेतली


"काही काळ सत्ताधारी तर काही काळ विरोधी म्हणून दिवस पाहिले. सत्तेत असताना असलेला कामाचा वेग आणि विरोधक असताना रखडेलेली कामे दोन्हींचा अनुभव घेतला. जर लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचे असेल तर त्याला सत्तेची जोड हवी, ही वास्तुस्थिती नाकारुन चालत नाही," असं अजित पवार म्हणालेत. तसेच पुढे बोलताना अजित पवार यांनी, "विरारधारा, ध्येयधोरणे यांच्याशी कोणतीही तडजोड न करता विकासकामे वेगाने मार्गी लागावित, याच उद्देशाने वेगळी भूमिका घेतली," असं म्हटलं आहे. "वेगळी भूमिका घेताना कोणाचा अवमान करणे, कोणच्याही भावाना दुखावणे, कोणालाही दगा देणे किंवा पाठीत खंजीर खुपसणे असा कोणताही उद्देश अजिबात नव्हता व कधीच नसेल," असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.
 



आशिर्वाद घ्यावा


पत्राच्या शेवटी अजित पवारांनी, "या पुढील काळातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणावरही वैयक्तिक स्वरुपाची टीकाटीप्पणी टाळून विकासाची ब्लू प्रिंट या राज्यातील जनतेसमोर घेऊन येईल इतकीच ग्वाही मी यानिमित्ताने राज्यातील जनतेला देऊ इच्छितो. विकासाच्या या वाटेवर सर्व सन्माननीय नागरिकांनी माझ्यासोबत यावं, वडीलधारी मंडळींनी आशिर्वाद घ्यावा असं विनम्र आवाहन करतो," असं म्हटलं आहे.