वेगळी भूमिका अन् भविष्य... अजित पवारांनी महाराष्ट्रातील जनतेला लिहिलेलं पत्र जसच्या तसं
Ajit Pawar Letter To People Of Maharashtra: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लिहिलेल्या या पत्रामध्ये एकूण 10 मुद्द्यांचा समावेश असून त्यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ते नुकतीच घेतलेली वेगळी भूमिका आणि भविष्याबद्दलही भाष्य केलं आहे.
Ajit Pawar Letter To People Of Maharashtra: विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2023 मध्ये मे महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही सहकऱ्यांसहीत थेट राज्यात सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सहभागी होत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या राजकीय भूकंपानंतर तब्बल 9 महिन्यांनी अजित पवारांनी आपण वेगळी भूमिका का घेतली यासंदर्भातील एक पत्रच महाराष्ट्रातील जनतेला लिहिलं आहे.
'घड्याळ तेच, वेळ नवी'
"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यासोबत जाताना वेगळा विचार केला, त्याबाबत अनेक माध्यमांतून विविध प्रकारे आजही चर्चा होत आहे. याविषयीची माझी नेमकी भूमिका राज्यातील सन्माननीय नागरिकांपर्यंत पोहोचावी या उद्देशानं केलेला हा पत्रप्रपंच," अशी कॅप्शन देत अजित पवारांनी हे पत्र शेअर केलं आहे. 'राज्यातीलील सर्वच सन्माननीय नागरिकांना' उद्देशून हे पत्र लिहिण्यात आलं आहे. या पत्राच्या मथळ्यावर म्हणजेच मास्ट हेडवर निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिलेलं घड्याळाचं निवडणूक चिन्ह दिसत असून त्याखाली 'घड्याळ तेच, वेळ नवी' अशी ओळ लिहिलेली आहे. तर उजवीकडे अजित पवारांचा फोटो दिसत आहे. या पत्रात काय म्हटलं आहे पाहूयात जसच्या तसं...
अजित पवारांचं पत्र जसच्या तस
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पार्टी, शिवसेना यांच्यासोबत जाताना वेगळा विचार केला, त्याबाबत अनेक माध्यमातून विविधप्रकारे आजही चर्चा होत आहे. याबाबत माझी नेमकी भूमिका राज्यातील सन्माननीय नागरिकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने याबाबत केलेला हा पत्रप्रपंच...
- सन 1991 पासून मी राजकीय जीवनात खऱ्या अर्थाने वाटचाल करती आहे. मला राजकारणात कोणी आणले, कोणी मला मंत्रीपद दिले, कोणी संधी दिली याबाबत अनेकदा चर्चा झाली. खरतर मला राजकारणात संधी अपघातानेच मिळाली, त्या काळी राज्यस्तरावर नेतृत्वासाठी एका युवकाची आवश्यकता होती. त्यामुळे कुटुंबीय म्हणून मला ती संधी मिळाली.
- संधी मिळाल्यानंतर त्या संधीची सोने करण्यासाठी मी रात्रीचा दिवस केला. कष्ट व परिश्रम केले. इतर सर्व जाबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करुन समाजकारणासाठी स्वत:ला वाहून घेतले. तीन दशकांपासून अधिक काळ हा प्रवास सुरु आहे. फक्त संधी मिळून चालणार नव्हते तर त्याचा लोकांची कामे होण्यासाठी कसा उपयोग करता येईल यावरच कायम माझा भर राहिला.
नक्की वाचा >> '...म्हणून मी सत्तेत सहभागी झालो'; 9 महिन्यांनंतर अजित पवारांनी सांगितलं खरं कारण
- पहाटे पाचपासून काम सुरु करण्याची सवय स्वत:ला लावून घेतली कारण हातात अशलेल्या वेळेत समाजोपयोगी, विधायक व विकासाची कामे वेगाने मार्ग लागावीत. ज्या मतदरांनी भरभरुन प्रेम केलं, विश्वास व्यक्त केला त्यांचे जीवमान अधिक कसे उचावेल यासाठी कायमच मी प्रयत्न केला.
- पहिल्या दिवसापासून राजकारण समाजकारण करताना इतर कोणत्याही मुद्दापेक्षा विकासालाच सर्वाधिक प्राधान्य दिले. आजही आणि भविष्यातही विकास हाच कायम माझा व माझ्या सर्व सहकाऱ्यांचा एककलमी कार्यक्रम असेल.
- काही काळ सत्ताधारी तर काही काळ विरोधी म्हणून दिवस पाहिले. सत्तेत असताना असलेला कामाचा वेग आणि विरोधक असताना रखडेलेली कामे दोन्हींचा अनुभव घेतला. जर लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचे असेल तर त्याला सत्तेची जोड हवी, ही वास्तुस्थिती नाकारुन चालत नाही.
- विरारधारा, ध्येयधोरणे यांच्याशी कोणतीही तडजोड न करता विकासकामे वेगाने मार्गी लागावी याच उद्देशाने वेगळी भूमिका घेतली. यात कोणाचा अवमान करणे, कोणच्याही भावाना दुखावणे, कोणालाही दगा देणे किंवा पाठीत खंजीर खुपसणे असा कोणताही उदेश अजिबात नव्हता व कधीच नसेल.
- कायमच वडिलधाऱ्यांविषयी आदराची भावना, समवयस्करांना सोबत घेऊन जाणे व युवकांना विविध ठिकाणी संधी देण्याचेच काम माझ्याकडून झाले आहे. आजही मी फक्त भूमिका घेतली आहे. सत्ता असेल तर मतदारसंघासह राज्यातील सर्वच विकासकामे वेगाने मार्ग लागतील ही स्वच्छ भूमिका आहे. यात कोणाचाही कसलाही अनादर करण्याचा अजिबात हेतू नव्हता व नसेल.
- या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली जो विकास होतो आहे तो मला महत्त्वाचा वाटला. कणखर नेतृत्व व योग्य निर्णय प्रक्रिया हे त्यांचे गुण मला भावले. माझी व त्यांची कार्यप्रणाली मिळतीजुळती आहे. कामावर आमचे जास्त प्रेम आहे. त्यांच्यासमवेत माझ्या भविष्यातील विकासाच्या ज्या योजना आहेत त्या अधिक प्रभावीपणे प्रत्यक्षात उतरविणे शक्य होईल, असे मला वाटल्याने मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. या राज्याला विकासात अग्रेसर कसे करता येईल या उद्देशाने मी ही भूमिका स्वीकारली आहे. मी सत्तेत आल्यानंतर विकासास आलेली गती आपण अनुभवली आहे.
- वडीलधारी किंवा ज्येष्ठांचा अनादर करणे असा हेतू नसून भविष्यात वेगाने लोकांचे राहणीमान कसे उंचवता येईल, मूलभूत पायाभूत सुविधा अधिक सक्षमक कशा करता येतील याचा विचार आहे.
- या पुढील काळातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणावरही वैयक्तिक स्वरुपाची टीकाटीप्पणी टाळून विकासाची ब्लू प्रिंट या राज्यातील जनतेसमोर घेऊन येईल इतकीच ग्वाही मी यानिमित्ताने राज्यातील जनतेला देऊ इच्छितो. विकासाच्या या वाटेवर सर्व सन्माननीय नागरिकांनी माझ्यासोबत यावं, वडीलधारी मंडळींनी आशिर्वाद घ्यावा असं विनम्र आवाहन करतो.