कोरोना झाल्याच्या अफवेमुळे मृत्युआधी मनस्ताप, मृत्युनंतर परवड
मृतदेह घंटागाडीतून नेऊन अंत्यसंस्कार करण्याची वेळ
रवींद्र कांबळे, सांगली : जत शहरातील एका तरुणाच्या बाबतीत ही दुर्दैवी घटना घडली आहे. कोरोनाच्या झाल्याच्या अफवेमुळे एका तरुणाच्या शेवटच्या दिवसांत त्याला मनस्ताप सहन करावा लागला आणि मृत्युनंतर मृतदेहाची परवड झाली.
सांगली जिल्ह्यातील एक तरुण रायगड जिल्ह्यातील तळोजा येथे कामाला होता. १७ दिवसांपूर्वी तो तळोजाहून गावी जत येथे आला होता. जत येथे आल्यानंतर त्याला क्वारंटाईन करण्यात आलं. हा तरुण आजारीही होता. पण त्याला कोरोना झाला नसतानाही क्वारंटाईन असताना त्याला कोरोना झाला असल्याची अफवा पसरली होती. त्यामुळे त्या तरुणाच्या कुटुंबीयांनाही मानसिक त्रास झाला.
दरम्यान, त्या तरुणाला एका रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर उपचार सुरु होते. तेथेही कोरोनाच्या भीतीमुळे त्याच्याकडे जायला तयार नव्हते. त्याचा मृत्यु झाल्यानंतर त्याला नेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये यायलाही कुणी तयार नव्हतं. मृतदेह नेण्यासाठी जत नगर परिषदेने आरोग्य अधिकाऱ्यांकडे अँम्ब्युलन्सची मागणी केली होती. मात्र पाच तास वाट पाहूनही अँम्ब्युलन्स मिळाली नाही.
नगरपालिकेने त्या तरुणाचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई किट देऊन पाठवले होते. पण अँम्ब्युलन्स नसल्याने अखेर कचरा नेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या घंटागाडीतून त्याचा मृतदेह नेण्यात आला. सोमवारी रात्री हा सगळा प्रकार घडला.
जतचे सामाजिक कार्यकर्ते दिनराज वाघमारे यांनी या घटनेची माहिती दिली. कोरोनाच्या अफवेमुळे या तरुणाच्या मृतदेहाची परवड झाली, असे वाघमारे यांनी सांगितले.
याबाबत जत नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत हाराळे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता ते म्हणाले, त्या तरुणाचा मृतदेह नेण्यासाठी आरोग्य विभागाकडे रुग्णवाहिका मागवली होती. मात्र चार ते पाच तास रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. त्यामुळे आम्ही तो मृतदेह घंटागाडीमधून नेला. मात्र ती घंटागाडी स्वच्छ केली होती.
कोरोनाची धास्ती समाजात किती आहे आणि अफवेमुळे विनाकारण कसा मनस्ताप भोगावा लागतो हे या घटनेत दिसून आलं आहे.