वाल्मिक जोशी, झी मीडीया, जळगाव :  अंगणवाडीत पोषण आहारात (Anganwadi nutrition Food) मृत पाल (Dead lizard) आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जळगाव जिल्ह्यात (Jalgaon district) ही घटना घडली आहे. सील बंद पाकिटात मृत पालीचा सांगाडा आढळला आहे.  यामुळे एकच खळबळ उडाली असून प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जळगाव जिल्ह्यातील आसोदा येथे हा पोषण आहार देण्यात आला होता.  गरोदर माता आणि अंगणवाडीतील मुलांना हा पोषण आहार दिला जाणार होता. अंगणवाडी मार्फत गरोदर माता आणि तिच्या मुलाला देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या सील बंद पॅकेट मध्ये मृत पाल आढळल्याने खळबळ उडाली आहे.  याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन जिल्हा परिषदेकडे तक्रार करण्यात आली आहे.


एका लाभार्थ्याला देण्यात आलेल्या पोषण आहारात बंद पाकिटात ही पाल आढळली आहे. याप्रकरणी संबंधित लाभार्थ्यांने जिल्हा परिषद व अन्न औषध प्रशासनाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीवरून अन्न व औषध प्रशासनाने हरभरा व मुगाच्या डाळीचे नमुने घेतले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या वतीने ही या प्रकरणी पुरवठा दराची चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांनी दिली आहे.


अनेकदा अंगणावाडीमध्ये पुरविण्यात येणाऱ्या आहाराचा दर्जा खूप निकृष्ट असतो. धान्य सडलेले तसेच बहुतेक वेळा यांना अळ्या देखील लागलेल्या असतात.  यासंदर्भात अनेकदा तक्रारी करून देखील संबंधित पुरवठा दारांवर कोणतीही कार्यवाही केली जात नाही. प्रशासनातील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी होऊन देखील त्याचा काहीही परिणाम या पुरवठा दारांवर होत नसल्याचे समोर आले आहे. 


मात्र, आता थेट सिल बंद पाकिटात मृत पाल सापडली आहे.  हा खूप संतापजनक प्रकार असून गरोदर माता आणि तिच्या बाळाच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असून या संदर्भात कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत. पाकिटांमध्ये धान्य भरताना ही मृत पाल दिसली नाही का? असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.