नागपूर :  उपचार घेत असलेल्या जिवंत महिलेचे डेथ सर्टिफिकेट तयार करून कुटूंबियांना बोलवल्याचा धक्कादायक प्रकार कोविडालय रुग्णालयातून समोर आला आहे.  रुग्णालयातून मून कुटूंबियांना फोन आला की, आशा मून यांचा ह्रदयविकाराच्या मृत्यू झाला आहे. मुलगा अजय यांनी आईचे पार्थिव घेण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली. तेथे प्लास्टिकच्या बॅगमधील पार्थिवाचा चेहरा पाहून जे काही घडलं त्याचा तुम्ही विचारही केला नसेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 
 नागपूरच्या हिंगणा परिसरातील जामठा येथील कोविडालय रुग्णालयात आशा मून यांना दाखल करण्यात आले होते.  शुक्रवारी त्यांची कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आली होती. कुटूंबातील इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने कुटूंबियांना घरी पाठवलं.
 
 कोविडालय रुग्णालयातून शनिवारी सकाळी अजय मून यांना फोन आला.  आशा मून म्हणजेच अजयच्या आई यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. आईच्या मृत्यूची बातमी कळताच. कुटूंबियांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. 
 
 तिकडे अजय यांनी मित्र आणि नातेवाईकांना आईच्या अंत्यविधिची तयारी करायला सांगितली. नातेवाईकांमध्ये शोक पसरला आणि काही वेळात कुटूंबिय आशा यांचे पार्थिव घरी आणणार होते.
 
 रुग्णालयात आल्यावर कुटूंबियांना आशा मून यांचे डेथ सर्टिफिकेट देण्यात आले. अजय यांनी आईचे अखेरचे दर्शन म्हणून चेहरा पाहू देण्याची विनंती केली.  अजय यांनी चेहरा पाहताच ती व्यक्ती आपली आई नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. आणि त्यांनी तत्काळ आशा होत्या त्या बेडकडे धाव घेतली. त्याठिकाणी त्यांची आई बसून होती. 
 
 आपल्या आईला सुखरूप पाहिल्यानंतर त्यांना आणि कुटूंबियांना मोठा दिलासा मिळाला परंतू त्यानंतर त्यांनी रुग्णालय प्रशासनाची खरडपट्टी काढली. त्यानंतर आशा यांनी घरी नेण्यात आले.
 


रुग्णालय प्रशासनाची माफी


 मून कुटूंबियांना देण्यात आलेला मृतदेह जलाबाई रामटेके यांचा होता. एका नर्सच्या चुकीमुळे आणि फाईलीची अदलाबदल झाल्याने ही घटना घडल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. रुग्णालयाने मून कुटूंबियांची माफी मागितली आहे. आशा यांचे डेथ सर्टिफिकेट रद्द केले आहे. रुग्णालयाने आशा यांचा उपचार खर्चही घेतला नसल्याची माहिती मिळतेय.
 
 संबधित प्रकरणाची हिंगणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत. परंतु रुग्णालयाच्या बेजबाबदार कारभारामुळे मून कुटूंबियांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागला.