प्रथमेश तावडे, झी मीडिया, वसई : सध्याच्या काळात लहान मुलांना मोठ्या प्रमाणात स्मार्ट फोनचे (Smart Phone) वेड लागल्याचे पाहायला मिळत आहे. याच वेडापायी अनेकदा मुलांवर गंभीर परिणाम झाल्याचेही पाहायला मिळत आहेत. स्मार्टफोनमुळे एका चिमुकलीला जीव गमावावा लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वसईत स्मार्ट फोनचा वापर करणं साडेतीन वर्षांच्या चिमुकलीच्या जीवावर बेतले आहे. वसई पश्चिमेच्या अग्रवाल कॉम्प्लेक्समधील रेजन्सी विला या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून मोबाईलच्या नादात खाली पडून साडे तीन वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. श्रेया महाजन असं मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.


शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे श्रेयाची आई बहिणीला शाळेत सोडण्यासाठी गेली होती. यावेळी  श्रेया घरात एकटीच झोपली होती. मात्र तिला जाग आल्यानंतर मोबाईल वर खेळता खेळता ती बाल्कनीमध्ये आली. हातातील मोबाईल खाली पडल्यामुळे श्रेया सुमारे 4 फूट उंचीच्या लोखंडी रेलिंगवर चढली. मात्र डोकावताना तिचा तोल गेला व सातव्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली पडल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.


एका सुरक्षा रक्षकाने मुलगी पडल्याचा आवाज आला. त्याने घटनास्थळी पोहोचून आरडाओरडा केला. काही वेळातच शेजारच्यांनी श्रेयाची ओळख पटवली. 


माणिकपूर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत . मात्र साडे तीन वर्षांच्या चिमुकलीचा झालेल्या या अशा निधनामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.