नागपूर : राष्ट्रीय सायकल पोलो स्पर्धेसाठी नागपुरात आलेल्या केरळच्या दहा वर्षीय खेळाडूचा मृत्यू (cycle polo player Nida Fathima dies in Nagpur) झाल्याची घटना समोर आली आहे. फातिमा निदा शहाबुद्दीन असे या दहा वर्षीय खेळाडूचे नाव असून ती केरळमधील (Kerala) अलेप्पी जिल्ह्याची रहिवासी होती. नागपुरातील सद्भावनानगर मैदानावर सायकल पोलो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्यात सहभागी होण्यासाठी ती आपल्या संघासह आली होती. मात्र स्पर्धेच्या आदल्या दिवशी रात्री तिला उलटी होऊन अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे निदाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या स्पर्धेसाठी केरळ येथील मुलींचा संघ बुधवारी नागपुरात दाखल झाला होता. त्यांच्या राहण्याची व्यवस्था धंतोलीमधील भारतीय मजदूर संघाच्या कार्यालयात करण्यात आली होती. मात्र निदाच्या पोटात दुखू लागल्याने सकाळी तिला धंदोली येथे एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. निदाची प्रकृती इतकी बिघडली होती की तिला व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवावे लागले. उपचारादरम्यान तिला इंजेक्शन देण्यात आले.मात्र, काही तासांनी तिची प्रकृती बिघडली आणि तिचा मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी धंतोली पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


चूक कोणाची?


"केरळ सायकल पोलो असोसिएशन राज्य सरकारशी संलग्न आहे आणि आम्ही खेळाडूंना तेथे पोहोचण्यासाठी सर्व व्यवस्था केली होती. पण एकदा ते तिथे पोहोचले की, आयोजकांनी खेळाडूंच्या गरजा पूर्ण करायच्या असतात. निदाच्या प्रकरणात काय झाले याची आम्ही चौकशी करत आहोत. निदाचा मृतदेह घरी आणण्यासाठी आम्ही सर्व सुविधा देऊ," असे केरळ क्रीडा परिषदेचे अध्यक्ष मर्सी कुट्टन यांनी म्हटले आहे.


एशियानेट न्यूजच्या वृत्तानुसार, निदा आणि स्पर्धेसाठी आलेल्या इतर खेळाडूंना तात्पुरत्या केंद्रात राहावे लागले कारण आयोजकांकडून भोजन आणि निवासाची व्यवस्था करण्यात आली नव्हती. सकाळी निदाची प्रकृती बिघडली आणि तिला व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवावे लागले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.


निदाच्या मृत्यूवरुन राजकारण


निदाच्या मृत्यची बातमी कळताच तिच्या वडिलांनी तात्काळ नागपूरकडे निघाले आहेत. ते आल्यानंतर निदाचे शवविच्छेदन होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता शवविच्छेदनातूनच निदाच्या मृत्यचे कारण समोर येणार आहे. दरम्यान केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी निदाच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे निदाच्या मृत्यूसाठी राष्ट्रीय क्रीडा महासंघ आणि राज्य क्रीडा परिषद या दोघांना जबाबदार धरले पाहिजे, असे केरळचे विरोधी पक्षनेते व्हीडी सठेसन यांनी म्हटले आहे.