Lok Sabha Election 2024 : माढा मतदार संघात सध्या उमेदवारीवरून सुरू झालेला वाद आता भाजपची डोकेदुखी बनू लागल्याचं चित्र आहे. माढा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून नाराज झालेल्या मोहिते-पाटील यांच्या अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर मतदारसंघातील मातब्बर नेत्यांनी हजेरी लावत खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध केला. या निमित्त उमेदवारीत डावलेल्या मोहिते-पाटलांनी भाजपेत्तर पक्षातील ताकदवर नेत्यांची मोट बांधत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यामध्ये महायुतीतील घटक पक्षांचे नेतेही उपस्थित होते. यामुळेच शिवरत्न बंगल्यावरील नाराजीनाट्याच्या खलबत्यांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपने माढा मतदारसंघातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर रविवारी मोहिते- पाटलांच्या अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर मतदारसंघातील अनेक दिग्गज नेत्यांनी भेट दिली. त्यात विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील, सातारा जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, रघुनाथराजे निंबाळकर, फलटणचे आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील, सांगोल्यातील डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख, माजी आमदार जयवंतराव जगताप, संजय कोकाटे, शिवाजी कांबळे यांच्यासह माण- खटाव व सोलापूरजिल्ह्यातील प्रमुख नेते उपस्थित होते.


राज्याच्या राजकारणाला दहा दिवसांत कलाटणी


अकलूजची भूमी महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींना कलाटणी देणारी आहे. येत्या दहा दिवसांत महाराष्ट्राचे संपूर्ण राजकारण बदललेले दिसेल, असे भाकित शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त करून खळबळ माजवून दिली. आपणाला शरद पवारांनी पाठविले आहे का, या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी मला कोणीच पाठवले नसले तरी इंडिया आघाडीत शरद पवारांचे शब्द प्रमाण मानतात. त्यामुळे आपण त्यांना सांगून आल्याचेही स्पष्ट केले.
माढ्यात भाजप नेत्यांमधील नाराजीनाट्य समोर आले आहे. 


भाजपकडून माढ्यात विद्यमान खासादर रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना तिकिट देण्यात आलं.  त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज झाले. धैर्यशील मोहिते पाटील हे माढ्यातून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. पण पक्षाकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आल्याने धैर्यशील मोहिते पाटील नाराज झाले आहेत. विजयसिंह मोहिते पाटील यांनीही आपली जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्यांच्या समर्थकाकडूनही प्रचंड संताप व्यक्त केला. मोहिते पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन आज अकलूजमध्ये आले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागलं. त्यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांची गाडी आढवली. त्यावेळी घोषणाबाजीही केली. महाजन यांचा रस्ता कार्यकर्त्यांनी आडवला होता. धैर्यशील मोहिते पाटील यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली. त्यानंतर गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांनी संबोधित केले. त्यावेळी त्यांनी अजून आपल्याकडे बराच वेळ असल्याचं सांगितलं.  


मोहिते पाटील आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये तासभर चर्चा झाली. महाजन यांनी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.  बंद दाराआड बैठक सुरू असताना मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते दाखल झाले.  गिरीश महाजन बाहेर येताच खूप कार्यकर्त्यांनी जोरजोरात घोषणाबाजी केली. त्यामुळे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी त्यांना पुन्हा घरात नेले. पण कार्यकर्त्यांचा रोष काही थांबला नाही. जवळपास दोन तास राडा सुरु होता. यावेळी कार्यकर्त्यांनी माढा आणि निंबाळकरांना पाडा अशी जोरदार घोषणाबाजी केली. त्याशिवाय  शरद पवार यांची तुतारी हाती घेण्याची मागणीही मोहिते पाटील यांच्याकडे केली. मोहिते पाटील यांची नाराजी , राग परवडणारा नाही, अजून बराच वेळ आहे, ही परिस्थिती पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालणार  आहे. वरिष्ठ निर्णय घेतील, आपल्याकडे बराच वेळ आहे, असं म्हणत गिरीश महाजन यांनी हात जोडून आणि गाडीवर उभारून कार्यकर्त्यांना शांत करण्याचा  प्रयत्न केला.