सोनू भिडे, नाशिक-  सध्या बँकांनी छोट्या वस्तू पासून मोठ्या वस्तू घेण्यासाठी इ. एम. आय.  तसेच क्रेडिट कार्डची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. सहजसुलभ म्हणून नागरिकही याचा मोठ्या प्रमाणात उपयोग करतात. मात्र हप्ते थकल्यानंतर याच बँकेतील एजंट पैसे वसूल करण्यासाठी दादागीरी करतात अश्या नेहमीच तक्रारी आहेत. नाशिकमध्येही एका नामांकित खाजगी बँकेच्या एजंटने थकीत पैश्यांची वसुली करण्यासाठी गेला असता थकबाकी धारकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे.  याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकच्या दीपक भास्कर अग्रहारकर  यांनी एच डी एफ सी बँकेचे क्रेडिट कार्ड घेतले होते. तीन वर्षापूर्वी त्यांनी क्रेडिट कार्डवर खरेदी केली. काही दिवस हप्ते व्यवस्थित भरल्यानंतर आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांचे हप्ते थकले होते. बँकेकडून सारखे पैसे भरण्यासाठी तगादा लावण्यात आला. पैसे नसल्याने बँक मॅनेजरशी बोलून त्यांनी काही दिवसांची मुदत मागून घेतली.


मात्र रविवारी सायंकाळी (दि.२९) अग्रहारकर घरी असताना एक अनोळखी तरुण त्यांच्या घरासमोर आला. त्याने स्वतःचे नाव अतुल जाधव असे सांगितले.  मी एचडीएफसी बँकेचे वसुलीचे काम करत असल्याचे सांगत तुमच्याकडे असलेले बँकेचे ८० हजार रुपये तुम्ही तातडीने भरून टाका असा उद्दामपणे दम भरला. अग्रहारकर यांनी माझे बँक मॅनेजराशी बोलणे झाले आहे असे सांगितले. मात्र अतुल जाधव यांनी काही न ऐकता पैसे आता भरावे लागतील असे सांगू लागला. जाधव ऐकत नसल्याने त्यांनी त्याला बँकेचे आय कार्ड मागितले. याचा त्याला राग आल्याने त्याने अग्रहारकर यांना शिवीगाळ केली तसेच त्यांना मारहाण सुद्धा केली. तसेच त्यांना जवळच असलेली विट मारून फेकली. वीट अग्रहारकर यांच्या खांद्याला लागल्यानं फॅक्चर झालं आहे. 


अग्रहारकर यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली आहे. या प्रकरणी  पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.