वणवा कुठपर्यंत न्यायचा ठरवा... मराठा समाजाचा सरकारला निर्वाणीचा इशारा
संभाजीराजे यांचे आझाद मैदानात उपोषण सुरु आहे. श्रीमंत यांनी समाजाला किंवा कुणालाही वेठीस धरले नाही. आमचा राजा उपोषणाला बसला आहे. याचे गांभीर्य सरकारला नाही.
मुंबई : संभाजीराजे यांची तब्येत ठीक नाही. छत्रपतींच्या तब्येतीबाबतीत सरकारला गांभीर्य नाही. आतापर्यंत आंदोलन शांततेत सुरु आहे. त्यांनी स्वतःला वेदना झाल्या तरी समाजाला वेठीस धरले नाही. मात्र, आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर उद्यापासून राज्यात रास्ता रोको केला जाईल असा इशारा महाराष्ट्र समन्वयक विनोद साबळे यांनी दिला.
शिवसेनेचे दोन खासदार, मुंबईच्या महापौर येथे आले. मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून परत येतो. आमच्याही धमन्यांमध्ये मराठी रक्त असल्याचे म्हणले. पण, ते जाऊन आता चार तास होत आले. तुमच्या रक्तातील धमन्यांचे काय झाले? असा संतापय सवाल त्यांनी केला.
राज्यसरकार या आंदोलनाची, उपोषणाची दखल घेत नाही. अजूनही निरोप आले नाहीत. पण, आम्ही मराठे आहोत. आम्हाला गनिमी कावा माहितीये. आमचे ए बी सी डी प्लॅन तयार आहेत. उद्यापर्यंत आमच्या मागण्याची दाखल घेतली नाही तर तालुका बंद, जिल्हा बंद झालेला दिसेल. हा वणवा कुठपर्यंत न्यायचा ते ठरवा आणि याचा विचार करा, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.
उद्यापासून मराठा समाजाचे वेगळे रूप पहायला मिळेल. वेळीच जागे व्हा. शांततेत आंदोलन सुरु आहे. आम्ही समाजाला वेठीस धरणार नाही. पण, राजेंना काही झालं तर त्याला सरकार कारणीभूत असेल. उद्याचा दिवस या सरकारला परवडणारा नसेल. सर्जरी आणि विरोध यांना धारेवर धरल्याशिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले.