श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : लहान मुलांच्या मोबाईल (Mobile) अतिवापरावर अनेकदा चर्चा होते. मोबाईलचे दुष्परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर (Health) होताना दिसतात. पण पालक मुलांच्या हातून मोबाईल सोडवू शकत नाहीत. पण यवतमाळच्या बांशी ग्रामपंचायतीनं यावर रामबाण उपाय शोधलाय. काय केलंय या ग्रामपंचायतीनं हे जाणून घेऊयात. (decision of banshi gram panchayat in yavatmal not to give mobile phones to teenagers)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या लहान मुलं मोबाईलच्या प्रचंड आहारी गेल्याचं पाहायला मिळतं. उठता-बसता-जेवताना मुलांना हातात मोबाईल लागतो. मोबाईलचा हाच अतिवापर पालकांसाठी डोकेदुखी ठरतोय तर मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीनंही घातक ठरतोय. याच समस्येवर यवतमाळच्या बांशी ग्रामपंचायतीनं ईलाज शोधलाय.18 वर्षांखालील मुला-मुलींना मोबाईल वापरण्यास बंदी घालण्याचा निर्णय ग्रामसभेनं घेतलाय. 


खेळ, शिक्षण, आरोग्य याकडे लहान मुलांचं लक्ष राहावं, पालकांचा मुलांशी संवाद वाढावा, सायबर गुन्हेगारीपासून मुलं दूर राहावीत यासाठी ग्रामसभेनं किशोरवयीन मुलांच्या मोबाईल वापरावर बंदी आणलीय. लहान मुलांमध्ये मोबाईलची क्रेझ जास्त असते. मोबाईलचा वापर करायलाही ते चटकन शिकतात. पण मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम लहान मुलांमध्ये पाहायला मिळतात. 


त्या पार्श्वभूमीवर बांशी ग्रामपंचायतीनं किशोरवयीन मुलांना मोबाईलबंदीचा निर्णय घेतलाय. या निर्णयाचं सर्वच स्तरातून स्वागत होतंय. मात्र कोरोनाकाळात शाळा बंद झाल्यामुळे याच मोबाईलच्या माध्यामातून शिक्षणाचे धडे दिले गेले. त्यामुळे पूर्णपणे मोबाईवर बंदी घालणं कितपत योग्य असाही प्रश्न उपस्थित होतो.