Declare June 20 as World Traitors Day: शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट संयुक्त राष्ट्रांना पत्र लिहिलं आहे. 20 जून हा दिवस जागतिक गद्दार दिवस (World Traitors Day) म्हणून साजरा केला जावा अशी मागणी राऊत यांनी केली आहे. संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांना लिहिलेल्या पत्रामध्ये राऊत यांनी 20 जून या दिवसाला जागतिक गद्दार दिवस म्हणून मान्यता देण्याची मागणी केली आहे. 21 जूनला ज्याप्रमाणे जागतिक योग दिवस साजरा केला जातो तसाच 20 जूनला जागतिक गद्दार दिवस म्हणून घोषित करावं असं या पत्रात म्हटलं आहे.


40 आमदार शिंदेंच्या बाजूने उभे राहिले आणि सरकार पडलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2022 साली विद्यमान मुख्यमंत्री आणि तत्कालीन महाविकास आघाडीमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंविरोधात बंड पुकरालं होतं. त्यानंतर एक एक करत 40 आमदार शिंदेंच्या बाजूने उभे राहिले आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पडलं. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर 30 जून रोजी भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.


राऊत पत्रात म्हणतात, बाळासाहेबांनी पक्ष स्थापन केला


"20 जून हा दिवस जागतिक गद्दार दिन म्हणून पाळला जावा अशी मागणी करण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे. मी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचं प्रतिनिधित्व करतो. मी भारताच्या वरीष्ठ सभागृहाचा सदस्य आहे. माझा पक्ष हा पश्चिम भारतामधील महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा पक्ष आहे. हा पक्ष 1966 साली बाळासाहेब ठाकरेंनी स्थानिक मुंबईकरांच्या हक्कांसाठी सुरु केला. माझ्या पक्षाचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतात. ते 28 नोव्हेंबर 2019 ते 29 जून 2022 दरम्यान मुख्यमंत्री होते," असा उल्लेख या पत्रात संजय राऊतांनी केला आहे.


पत्रात एकनाथ शिंदेंचा उल्लेख


"20 जून रोजी भारतीय जनता पार्टीने फूस लावल्याने आमच्या पक्षातील 40 आमदारांनी आमची साथ सोडली. त्यांच्यापैकी प्रत्येकाने 50 कोटी रुपये घेतल्याचं सांगितलं जातं. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपाने हे सारं केलं. आम्हाला सोडून गेलेल्या 40 आमदारांचं नेतृत्व एकनाथ शिंदे करत असून ते सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याबरोबर महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे 10 अपक्ष आमदारही आम्हाला सोडून गेले," असा घटनाक्रम राऊत यांनी पत्रात सांगितला आहे.



आजारपणाचा गैरफायदा घेतला


"ही सर्व प्रक्रिया 20 जून रोजी सुरु झाली जेव्हा एकनाथ शिंदे आणि त्यांचे काही सहकारी मुंबईवरुन शेजारच्या गुजरात राज्यात पळून गेले. त्यांनी आजारी असलेल्या आणि 12 नोव्हेंबर तसेच 19 नोव्हेंबर 2021 रोजी मोठ्या शस्त्रक्रीया झालेल्या उद्धव ठाकरेंची फसवणूक केली. त्यांच्यापैकी प्रत्येकाने उद्धव ठाकरेंच्या आजरपणाचा गैरफायदा घेतला. त्यामुळेच मी तुम्हाला विनंती करतो की ज्याप्रमाणे 21 जूनला जागतिक योग दिन म्हणून मान्यता दिली आहे तशीच 20 जून या दिवसाला जागतिक गद्दार दिन म्हणून मान्यता द्यावी. हा गद्दारी संपूर्ण जगाच्या लक्षात राहिली पाहिजे," असं म्हणत राऊत यांनी पत्राचा शेवट केला आहे.



राऊत यांनी ट्वीटरवरुन हे पत्र लोकाग्रस्तव अशा कॅप्शनसहीत पोस्ट केलं आहे. राऊत यांनी संयुक्त राष्ट्रांबरोबरच, संयुक्त राष्ट्रांचे अध्यक्ष, पंतप्रधान कार्यालयक, भाजपा, उद्धव ठाकरे यांना टॅग केलं आहे.