नांदेड : जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे मुंबईत निधन झाले आहे. अंतापूरकर यांना कोरोनाची लागण झाली होती. मुंबईत उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.


कोरोना संसर्ग राज्यात बेफाम गतीने पसरत आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूरचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांनाही कोरोनाने गाठले.  कोरोना संसर्गामुळे त्यांची तब्बेत खालावली. गेल्या 12 दिवसांपासून अंतापूरकर यांच्यावर मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. 
 
अंतापूरकरांना कोरोनाचा अधिक त्रास होत होता. त्यामुळे त्यांना काही दिवसांपासून व्हेन्टीलेटरवर ठेवले होते. अखेर त्यांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली. आज त्यांचे निधन झाले.
 
अंतापूरकर मंत्री अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय होते. 2009 आणि 2019 असे 2 वेळा ते देगलूर मतदार संघातून निवडून आले होते.  मितभाषी आणि साधी राहणीमान अशी अंतापूरकर यांची ओळख होती. अंतापूरकर यांना मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता.