अमरावती : दिल्लीतील निजामुद्दीन कार्यक्रमात सहभागी झालेल्या अमरावतीतील पाच जणांचा शोध घेण्यात आला आहे. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे.  दिल्लीतल्या या कार्यक्रमात देशभरातून शेकडो लोक सहभागी झाले होते, त्यापैकी अनेकांचा मृत्यू झाला आहे. तेलंगणा राज्यातील सहा जणांचा मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता चिंता व्यक्त करण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये तबलीगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात अमरावतीचे पाच जण सहभागी झाली होते. त्या पाचही जणांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले आहे. यात एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या पाचही जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या एकही कोरोनाचा रुग्ण नसल्याची माहिती पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.


दरम्यान, दिल्लीतील या कार्यक्रमात आता महाराष्ट्रातून या कार्यक्रमात कोण सहभागी झाले होते, याचा राज्य सरकार शोध घेत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तसे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. अमरावतीत पाच जण सापडल्याने चिंता वाढली आहे. असे कोणी सहभागी झाले असतील त्यांनी स्वत:हून होम क्वारंटाईन होवून आरोग्य विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. जर असे कोणी असतील तर त्यांनी इतरांशी संपर्क करु नये, असे कळकळीचे आवाहनही करण्यात आले आहे.


दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये तबलीगी जमात कार्यक्रमात दीड-दोन हजार लोक सहभागी झाले होते असा अंदाज आहे. या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेले काही लोक इंडोनेशिया आणि मलेशियामधूनही आले होते. त्यांनी २७ फेब्रुवारी ते १ मार्च या काळात क्वाललांपूर इथे झालेल्या कार्यक्रमातही भाग घेतला होता, अशी माहिती मिळाली आहे. त्यानंतर हा गट दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाला. 


या कार्यक्रमात सहभागी झालेले ६ जण तेलंगणामध्ये परतल्यानंतर त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि त्यानंतर कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांचा शोध सुरु करण्यात आला आहे. निजामुद्दीनमधील कार्यक्रमात सहभागी झालेल्या महाराष्ट्र, बिहार, दिल्ली, नेपाळमधील १४ लोकांना पोलिसांनी फिरत असताना पकडून क्वारंटाईन केले आहे.