Mumbai Megablock : मुंबईतील 154 वर्षे जुना ब्रिटिशकालीन कर्नाक पूल (British Carnac bridge) पाडण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर 19 ते 21 नोव्हेंबर दरम्यान 27 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या पाडकामामुळे 36 मेल एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते भायखळा आणि वडाळादरम्यानची उपनगरीय लोकल सेवाही बंद ठेवण्यात येईल. मध्य रेल्वेवर बहुतांश लोकल गाड्यांच्या फे-या दादरपर्यंत होतील. तर हार्बर मार्गावर बहुतांश फेऱ्या या वडाळ्यापर्यंत चालवण्यात येणार आहेत. 19 आणि 21 नोव्हेंबरला बहुतांश मुंबई पुणे एक्स्प्रेस गाड्यांसह इतर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. (Mumbai : will be demolished of 154-year-old British Carnac bridge)


मुंबई-पुणे मार्गावरील या रद्द


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मशीद बंदर रेल्वे स्थानकांदरम्यानचा 154 वर्षे जुना कर्नाक उड्डाणपूल पाडण्यासाठी 27 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे 36 मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुंबई-पुणे मार्गावरील इंटरसिटी, डेक्कन, सिंहगड, प्रगती, डेक्कन क्वीन यांचा समावेश आहे.


लोकल सेवाही बंद


मध्य रेल्वे मार्गावरील  धोकादायक कर्नाक बंदर उड्डाणपूल 19 नोव्हेंबरला रात्री 11 वाजल्यापासून पाडण्यात येणार आहे. त्यामुळे सीएसएमटी ते भायखळा आणि वडाळादरम्यानची उपनगरीय लोकल सेवाही बंद ठेवण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली. 


अनेक लांबपल्ल्याच्या गाड्याही रद्द


मुंबईत 19 नोव्हेंबर रोजी येणारी पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस, हुस्सेन सागर एक्सप्रेस, देवगिरी एक्स्प्रेस, महालक्ष्मी एक्स्प्रेस, नांदेड राज्यराणी एक्स्प्रेस आणि गरीबरथ एक्स्प्रेस या गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. 20 नोव्हेंबर रोजी मुंबई-नांदेड तपोवन, मुंबई-पुणे-मुंबई इंटरसिटी, मुंबई-जालना जनशताब्दी, मुंबई-मनमाड विशेष गाडी, मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस, मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेससह अन्य काही गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.


काही एक्स्प्रेस दादर, पनवेलहून सुटणार


मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी मुंबईऐवजी पनवेल येथून सुटतील, तर काही गाड्या दादर, तसेच पुण्यातून सोडण्यात येणार आहेत. मुंबईला येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेस, हावडा, फिरोजपूरसह, इंद्रायणी एक्स्प्रेस, मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस, कोकणकन्या एक्स्प्रेस यासह अन्य गाड्या दादर आणि पनवेलपर्यंतच चालवण्यात येणार आहेत.