डेंटिस्ट पदाच्या भरतीतील मोठा घोळ उघड
राज्य सरकारचा आरोग्य विभाग आणि MPSC ने घातलेल्या गोंधळामुळं डेंटिस्ट पदांच्या भरतीत प्रचंड मोठा घोळ झाल्याचे समोर आलंय.
कृष्णात पाटील झी मीडिया, मुंबई : राज्य सरकारचा आरोग्य विभाग आणि MPSC ने घातलेल्या गोंधळामुळं डेंटिस्ट पदांच्या भरतीत प्रचंड मोठा घोळ झाल्याचे समोर आलंय. सेवाप्रवेश निकष धाब्यावर बसवत MPSCने अपात्र उमेदवारांची भरती केली असून राज्य सरकार अशा उमेदवारांना नियुक्तीही देवू लागल्यानं मॅटने या भरतीप्रक्रियेवर स्थगिती आणली आहे.
काय आहे प्रकरण?
राज्याच्या ग्रामीण रुग्णालयांमध्ये गेल्या ८-१० वर्षांपासून एनएचएम म्हणजे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत हे दंतशल्यचिकित्सक पदावर काम करतायत. आज ना उद्या आरोग्य विभाग कायम करेल या आशेने हे दंतशल्यचिकित्सक कमी पगारात तिथं काम करत आहेत. पण त्यांच्या मागणीला न जुमानता राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत जुलै २०१५ मध्ये आरोग्य विभागाकरता १८९ दंतशल्यचिकित्सिक पदासाठी जाहीरात काढली. त्यासाठी २४०० जणांनी अर्ज केले. इथंही या एनएचएम अंतर्गत काम करणा-या डेंटिस्टवर अन्याय तर झालाच शिवाय या भरती प्रक्रियेत आरोग्य विभाग आणि MPSCने मोठा घोळही घातला.
खाजगी प्रॅक्टीस करणा-यांना प्राधान्य
आरोग्य विभागाने ऑक्टोबर २०१५ मध्ये पहिल्यांदाच या पदांसाठी वैयक्तिक क्लिनिकलमधील अनुभव ग्राह्य धरण्यास MPSCचला सांगितलं. जे सेवा प्रवेश नियमांच्या पूर्णपणे विसंगत होतं. यापूर्वी केवळ शासकीय आणि निमशासकीय संस्थेतील अनुभव ग्राह्य धरण्यात आला होता. परिणामी अधिक अनुभव असलेल्या खाजगी प्रॅक्टीस करणा-यांना मुलाखतीमध्ये प्राधान्य मिळाले. याविरोधात उमेदवारांनी आवाज उठवल्यानंतर आरोग्य विभागाला आपली चूक समजली आणि १७ नोव्हेंबर २०१६ ला पुन्हा MPSCला पत्र लिहून वैयक्तिक क्लिनिकमधील अनुभव ग्राह्य धरू नको असं कळवत दिलगिरी व्यक्त केली. परंतु MPSC ने या पत्राकडं दुर्लक्ष करत लगेच दुस-या दिवशी १८ नोव्हेंबर २०१६ ला डेंटिस्ट पदांचा निकाल जाहीर केला. ज्यामध्ये अपात्र उमेदवारांची निवड झाल्याचा आरोप होतोय. तरीही पुन्हा आरोग्य विभाग याच उमेदवारांना नियुक्तीपत्र देत कामावर रुजू करत आहे.
हे प्रश्न उपस्थित
डेंटिस्ट पद भरतीचे निकष तयार नसतानाही MPSC ने जाहीरात का काढली ? जाहीरात काढल्यानंतर निकष का बदलण्यात आले ? वैयक्तिक क्लिनिकमधील अनुभव ग्राह्य धरण्याबाबतचा अभिप्राय नियमात नसतानाही आरोग्य विभागाने का आणि कुणाच्या फायद्यासाठी दिला ? आरोग्य विभागाने दिलगिरी व्यक्त करत अभिप्राय चुकीचे असल्याचे कळवल्यानंतरही MPSC ने लगेच निकाल का जाहीर केला ? जर सेवा प्रवेश नियमानुसार MPSC ने उमेदवार निवडलेले नाहीत, तर मग आरोग्य विभाग या उमेदवारांना नियुक्तीपत्र देवून कामावर का रूजू करून घेत आहे. ?
कल्याणकारी राज्याची भाषा बोलणा-या सरकारने एनएचएम अंतर्गत इतकी वर्षे काम करणा-या डेंटिस्टना कार्यमुक्त करण्यास सुरुवात केली असून त्यांच्याजागी या वादग्रस्त भरती प्रक्रियेतील उमेदवारांना रुजू केलं जातंय.