उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाचे बॅनर चर्चेत
अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार किंवा पत्नी सुनेत्रा पवारही निवडणुकीच्या मैदानात दिसू शकतात. यामुळे यंदा बारामतीत कौटुंबिक लढत पहायला मिळणार आहे.
Maharashtra Politics : राष्ट्रवादीत दोन गट पडले आणि राज्याचं राजकारण बदललं.आता मात्र आगामी निवडणुकीमध्ये बारामतीत दोन्ही गटात कुटुंबामध्येच लढत होणार असल्याच्या चर्चा रंगतायत. त्याला कारण ठरलं ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना देण्यात आलेल्या शुभेच्छा. बारामतीच्या भावी खासदार या अर्थाच्या शुभेच्छा देणारा फ्लेक्स सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसनिमित्त वारजे पुलाखाली लावण्यात आला.
वारजे हा बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग असल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या.येत्या लोकसभा निवडणुकीत बारामतीत नणंद विरुद्ध भावजय म्हणजेच सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगणार असल्याची चर्चाही यानिमित्तानं सुरु झाली.असं असताना बुधवारी संध्याकाळी लागलेला फ्लेक्स गुरुवारी सकाळी मात्र गायब झालेला पाहायला मिळाला. या होर्डिंग्जवर सुनेत्रा पवार आणि अजितदादा पवार यांचा फोटो होता. तसंच सोबत संसदेचा फोटोही होर्डिंग्जवर लावण्यात आला होता.मात्र यामुळे सुप्रिया सुळे यांना घरातूनच आव्हान मिळणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत.
अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार किंवा पत्नी सुनेत्रा पवारही निवडणुकीच्या मैदानात दिसणार?
लोकसभेला अजित पवार गटाच्या वाट्याला मोजक्याच जागा येऊ शकतात. त्यामुळे पदरी पडलेल्या जागा जिंकून आपली शक्ती वाढवण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीनंच लोकसभेसाठी नवीन चेह-यांना अजित पवार संधी देऊ शकतात. विशेषत: राज्यात लोकप्रिय असणा-या नावांना लोकसभेसाठी संधी दिली जाऊ शकते.
यात अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार किंवा पत्नी सुनेत्रा पवारही निवडणुकीच्या मैदानात दिसू शकतात. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध मुलगा पार्थ किंवा पत्नी सुनेत्रा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा विचारही अजित पवार करत असल्याची माहिती आहे.
शिरूर लोकसभा मतदार संघात अभिनेते अमोल कोल्हे हे शरद पवार गटाचे विद्यमान खासदार आहेत. त्यांच्याविरोधात अजित पवार गटाकडून सहकार मंत्री वळसे पाटलांना संधी मिळू शकते. साता-यात शरद पवार यांचे खास-विश्वासू अशी ओळख असणा-या श्रीनिवास पाटील यांच्याविरोधात रामराजे नाईक निंबाळकर किंवा नितीन पाटील यांना अजित पवार गटाकडून पसंती मिळू शकते..
छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या इम्तियाज जलील यांच्याविरोधात विधानपरिषदेतील आमदार सतीश चव्हाण यांना तयारी करण्याच्या सूचनाही पक्षाने दिल्याचे समजतंय तर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून सध्या काँग्रेसमध्ये असेलेले माजी खासदार मिलिंद देवरा यांना उतरवलं जाणार अशी चर्चा आहे. त्यांच्या प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत दोन बैठकही झाल्या असल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादीमधील फुटीनंतरही राज्यातील चारपैकी 3 खासदार अजूनही शरद पवारांसबोतच आहेत. सुनील तटकरे हे एकमेव खासदार अजित पवारांसोबत आहेत. त्यामुळे लोकसभेतील ताकद वाढवण्यासाठी स्मार्ट खेळी खेळण्याच्या तयारीत अजित पवार आहेत. ऐनवेळी उमेदवार जाहीर करण्यापेक्षा आधीच घोषणा करुन प्रचारात आघाडी घेण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय.