मुंबई : कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत असून राज्यातील १४ एप्रिलला संपणारे लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकहितासाठी घेतलेल्या ३० एप्रिलपर्यंतच्या टाळेबंदीला राज्यातील जनतेनं सहकार्य करावं. प्रत्येकानं घरातंच थांबावं, डॉक्टर, पोलिस, शासकीय यंत्रणांना सहकार्य करावं असे अजित पावर म्हणाले. ही टाळेबंदी यशस्वी झाली तर कदाचित पुन्हा टाळेबंदी वाढवावी लागणार नाही असे दिलासादायक विधान पवार यांनी केले. याचा विचार करुन राज्यातल्या प्रत्येकानंच कोरानावर मात करण्यासाठी कटिबद्ध होऊया, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले. 



राज्याच्या काही भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येनं सापडत आहेत. तिथला संसर्ग रोखण्यासाठी संबंधित गावे, वाड्या, वस्त्या, सोसायट्या सील केल्या जात आहेत. यामुळे सध्या गैरसोय होत असली तरी लोकांचा जीव वाचवण्यासाठी हे आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले. 


यावेळी अजित पवार यांनी 'ईस्टर संडे'निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. भगवान येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचा हा दिवस आपल्या जीवनात आनंद घेऊन येईल. मानवतेच्या सेवेसाठी प्रेरीत करेल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.


कोरोनाच्या संकटामुळे 'ईस्टर संडे'ची प्रार्थना आपापल्या घरात करावी, कुणीही घराबाहेर पडू नये, घरात रहा, सुरक्षित रहा, असं आवाहनही त्यांनी केलंय.