मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवायच्या; अजित पवारांची घोषणा
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या आपापल्या पक्षाने आपापल्या ताकदीवर लढवायच्या आहेत अशी घोषणा अजित पवारांनी (Ajit Pawar) पुण्यात (Pune) केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) मेळाव्यात बोलताना त्यांनी हे विधान केलं.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या आपापल्या पक्षाने आपापल्या ताकदीवर लढवायच्या आहेत अशी घोषणा अजित पवारांनी (Ajit Pawar) केली आहे. ते पुण्यात बोलत होते. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अजित पवारांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर केलं. तसंच कार्यकर्त्यांना व्यवस्थितपणे काम करण्याच्या सूचना दिल्या.
अजित पवार दोन दिवसांपासून पुण्यात आहेत. रविवारी त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित केलं. यावेळी ते म्हणाले की, "लोकसभा आणि विधानसभा आपण महायुतीमध्ये एकत्र लढणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या आपापल्या पक्षाने आपापल्या ताकदीवर लढवायच्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी वॉर्ड, प्रभाग, गटात व्यवस्थितपणे काम करावं. आपण योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या तर ते विसरणार नाहीत".
भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी यावर प्रतिक्रिया देताना तिन्ही पक्षाचे नेते याबाबत अंतिम निर्णय घेतील असं सांगितलं आहे. "स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला अद्याप अवकाश आहे. महायुती म्हणून आम्ही सर्व निवडणुका लढणार आहोत हे तर नक्की आहे. विधानसभा एकत्रित लढायचं हे अंतिम आहे. ताकदीने, एकवाक्यतेने आम्ही लढणार आहेत".
पुढे ते म्हणाले की, "तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था, शिक्षण संस्था आणि इतर निवडणुकीबाबत एकत्रित निर्णय घेतील. अजित पवारांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात तसं विधान केलं आहे याचा अर्थ आम्ही एकत्रित निवडणूक लढणार नाही असं नाही. आम्ही त्या निवडणुकाही एकत्रित लढू आणि जिंकू. पक्षाचे तिन्ही नेते अंतिम निर्णय घेतील"