मुंबई : पुणे शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कारवाई अधिक प्रभावी आणि गतिमान करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री.अनिल कवडे, श्री,सौरभ राव, श्री. सचिंद्र प्रतापसिंग आणि श्री.कौस्तुभ दिवेगावकर या चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची पुणे शहरासाठी विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे विभागीय आयुक्त आणि पुणे महापालिका आयुक्तांना कोरोनाविरुद्धच्या लढाईत हे अधिकारी सहाय्य करणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याच्या मुख्य सचिव कार्यालयातर्फे आज यासंबंधीचे आदेश जारी करण्यात आले. श्री.अनिल कवडे हे राज्याचे सहकार आयुक्त आहेत. श्री. सौरभ राव यांच्याकडे साखर आयुक्तपदाची जबाबदारी आहे. श्री. सचिंद्र प्रतापसिंग यांच्याकडे पशुसंवर्धन आयुक्त तर, श्री.कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे भूजल सर्व्हेक्षण संचालकपदाचा कार्यभार आहे. हे चारही अधिकारी मूळ जबाबदारी सांभाळून पुणे महापालिका क्षेत्रातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी सेवा देणार आहेत. 


या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी आणि व्यापक होऊन शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल.