Thackeray Group: शिवसेनेत फूट पडून ठाकरे गट आणि शिंदे गट वेगळे झाले. यानंतर राज्यभरात दोन्ही गटात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी शिवसेनेच्या शाखांच्या मालकीवरुन राडे पाहायला मिळतात. त्यात आता आणखी एका राड्याची भर पडली आहे. फरक फक्त इतकाचं आहे की, बाकीच्या राड्यांमध्ये दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडताना दिसतात. पण वांद्रे येथे झालेल्या राड्यात पालिका अधिकाऱ्याला कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राडा प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. अशाप्रकारे कोणी कायदा हातात घेणार असेल तर त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई होईल, अशी प्रतिक्रिया गृहमंत्र्यांनी दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाकरे गटाकडून पालिका अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीबद्दल देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली. कोणीही कायदा हातात घेऊ शकत नाही, दोषींवर शंभर टक्के कारवाई होणार, असे फडणवीस यावेळी म्हणाले.


वांद्रे येथे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पालिका अधिकाऱ्याला मारहाण केली आहे. मारहाण करतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. ठाकरे गटाच्या शाखेवर कारवाई केल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले होते. पालिका अधिकाऱ्यांकडून वांद्रे येथील अनधिकृत शाखेवर कारवाई करण्यात आली होती.


बाळासाहेब ठाकरे यांचा आतमध्ये फोटो शाखेत असताना कारवाई केल्याने ठाकरे गट आक्रमक झाला आहे. या कारवाईचा जाब विचारण्यासाठी ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाकडून मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्याची भेट घेण्यात आली होती.


पालिका अधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटाला भेट द्यावी, अशी मागणी वारंवार केली जात होती. पण ही भेट टाळली जात होती,असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. अखेर आज शिष्टमंडळाने पालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली.


वांद्य्रातील अनधिकृत शाखेवर कारवाई होताना बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आतमध्ये होता. बाळासाहेबांचा फोटो शाखेत असताना तोडक कारवाई केल्याने कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. 


त्यामुळे अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाने केली. मुंबई महापालिका वॉर्ड ऑफिसमध्ये जाऊन ही मागणी करण्यात आली.