अंबाबाई मंदिरात तोकडे कपडे बंदीवर देवस्थान समिती ठाम
अंबाबाईच्या मंदिरात तोकडे कपडे घालून येणाऱ्यांवर घातलेल्या बंदीच्या भूमिकेवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान ठाम आहे.
कोल्हापूर : अंबाबाईच्या मंदिरात तोकडे कपडे घालून येणाऱ्यांवर घातलेल्या बंदीच्या भूमिकेवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान ठाम आहे. भक्तांना आवाहन करून त्यांचं मनपरिवर्तन करणार असल्याचं देवस्थान समितीनं सांगितलंय. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात भूमिका मांडली.
दरम्यान, नवरात्रौ सुरु होण्याआधीच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षांनी तोकड्या कपड्या संदर्भात केलेले विधान मागे घ्यावे अन्यथा भूमाता ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांना चोप देईल, असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी दिला आहे. महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांनी तोकड्या कपड्यात येऊ नये, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने करण्यात आले. समितीचा हा निर्णय वादग्रस्त ठरला असून याचे पडसाद येणाऱ्या काही दिवसात उमटण्याची शक्यता आहे.
अंबाबाई मंदिरात तोकडे कपडे घालून येणाऱ्या भाविकांना बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ३ हजार मंदिरांमध्ये हाच निर्णय लागू करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मंदिर प्रवेशाबाबत घेतलेल्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. जे भाविक या मंदिरात येतात त्यांना अशा लोकांकडे पाहून मनात लज्जा उत्पन्न होते. त्यामुळे अनेक भाविकांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे देवस्थान समितीने स्पष्ट केले आहे.