नागपूर : अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात भाजपने आज हिवाळी अधिवेशनात चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला. अवकाळीग्रस्तांना हेक्टरी २५ हजार रूपये मदत देण्याची मागणी स्वतः उद्धव ठाकरे यांनी केली होती. ही मदत जाहीर होत नाही तोवर सभागृह चालवू नका, अशी घोषणा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सभागृह सुरू होण्याआधीच आज सकाळी भाजपने विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. भाजप आमदारांनी सामना वृत्तपत्राच्या बातमीचे बॅनर तयार करून झळकावले. शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी २५ हजार रूपये मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली. सभागृहाचं कामकाज सुरू होताच भाजपतर्फे विधीमंडळात जोरदार गदारोळ करण्यात आला.


अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या भरवशावर आश्वासन दिलं होतं का? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. आम्ही ५ वर्ष केंद्राच्या भरवशावर मदत दिली नव्हती, तर राज्यातूनच मदत केली, असं फडणवीस म्हणाले.


भाजपने केलेल्या आंदोलनाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला. सामना वाचत नाही सांगणारेच आज सभागृहात सामना घेऊन आले. सामना तेव्हाच वाचला असता तर आता सामना करायची वेळ आली नसती, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.


पूरग्रस्त आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालंय त्यासाठी केंद्राकडे १५,५०० कोटी रुपये मागितले आहेत. भाजपचं केंद्रात सरकार आहे, त्यांनी इथे गळा काढण्यापेक्षा दिल्लीत गळा काढावा. शिमगा करायचा असेल, तर तो दिल्लीत जाऊन करावा, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. केंद्राकडून १५ हजार कोटीचा जीएसटी परतावा आम्ही मागितला होता, त्यातला ४,५०० कोटींचा पहिला हफ्ता आला आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.