नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दर्शवल्याने महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहून नवाब मलिक महायुतीत नको असं जाहीरपणे सांगितलं आहे. त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालिन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही असं सांगत फडणवीसांनी अजित पवारांकडे भावनांची नोंद घेण्याचं आवाहन केलं आहे. यानंतर भाजपाचे सर्वच नेते आता नवाब मलिकांच्या विरोधात भूमिका घेत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सभागृहात दाखल झालेले नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले आणि आपण अजित पवार गटाच्या बाजूने असल्याचं स्पष्ट केलं. पण देवेंद्र फडणवीस यामुळे नाराज झाले असून, नवाब मलिक आपल्यासोबत नको अशी जाहीर भूमिका घेतली आहे. नवाब मलिक प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी ठाम भूमिका घेतली असून मी माझी भूमिका मांडलीय, तुम्ही पुढे काय करायचं ते ठरवा असं प्रफुल्ल पटेलांना सांगितलं आहे. प्रफुल्ल पटेल हे मलिक प्रकरणी चर्चा करण्यासाठी फडणवीसांच्या भेटीला गेले होते. मलिकांनी भूमिका जाहीर केलेली नाही त्यामुळे मलिकांबाबत भूमिका घ्यायला नको होती असं मत पटेलांनी मांडलं. मात्र, फडणवीसांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत मलिकांना विरोध केला आहे.


यादरम्यान, आज सभागृबाहेर देवेंद्र फडणवीस आणि नवाब मलिक आमने-सामने आले होते. देवेंद्र फडणवीसांनी यावेळी नवाब मलिकांना हात जोडून नमस्कार केला आणि पुढे निघून गेले. त्यांनी यावेळी नवाब मलिकांशी बोलणं टाळलं. दरम्यान दुसरीकडे नवाब मलिकही न थांबता पुढे जाताना दिसले. 



देवेंद्र फडणवीसांचं अजित पवारांना पत्र जसंच्या तसं - 


माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य श्री. नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो. परंतू, ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे.


सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सद्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे. हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे. परंतू, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे.


त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालिन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी मला आशा आहे.


काँग्रेसचा फडणवीसांवर हल्लाबोल


नवाब मलिक प्रकरणी काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे आहेत त्यांची साथ महायुतीत नको ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका दुटप्पीपणाची आहे. नवाब मलिक चालत नाहीत तर मग कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमचा साथीदार इक्बाल मिर्चीशी संबंधीत प्रफुल्ल पटेल फडणवीसांना कसे चालतात? असा सवाल करुन फडणवीस यांचे देशप्रेम नकली आहे, अशा नकली देशप्रेमाची नौटंकी महाराष्ट्रात चालणार नाही, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.


मलिक तटस्थ


नवाब मलिकांवरून राजकारण तापलं असताना नबाव मलिकांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतलाय. मलिकांच्या कार्यालयाकडून ही माहिती मिळाली. एनसीपी पक्ष कार्यालय एकच आहे, कोणत्या गटाचे नाही यामुळे एनसीपी पार्टी कार्यालयात मलिक बसले होते अशी माहिती सुत्रांकडून मिळतेय.