सातारा : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)  आणि प्रवीण दरेकर (Praveen Darekar) आजपासून तीन दिवस पश्चिम महाराष्ट्राच्या पूरग्रस्त पाहणी दौऱ्यावर आहेत. आज सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी त्यांनी केली. सातारा जिल्ह्यातील कोयना धरण क्षेत्रातील कित्येक गाव बाधित झाली आहेत. आंबेघर आणि मोरगिरीमधील पूरग्रस्तांची भेट घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे सांत्वन केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कराड इथून रवाना होण्यापूर्वी कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी महाराष्ट्र भाजयुमोच्या वतीने मदतसामुग्री असलेल्या वाहनांना आज दुपारी देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचा झेंडा दाखवून रवाना केलं. या मदतसामुग्रीत तयार अन्न, धान्यसामुग्री, पाणी, कपडे इत्यादींचा समावेश आहे. मोरगिरी/आंबेघर इथं पाऊस आणि पूर यामुळे संसार उघड्यावर पडलेले आहेत. तात्पुरत्या निवासी शिबिरांमध्ये त्यांना सध्या ठेवण्यात आलं आहे. मोरणा विद्यालय मोरगिरी इथं या पूरग्रस्तांना भेटून, त्यांच्यासोबत भोजन करत त्यांच्या व्यथा देवेंद्र फडणवीस यांनी जाणून घेतल्या. आंबेघर इथं दरड कोसळण्याच्या घटनेत सुमारे 15 लोकांचे प्राण गेले. त्यांच्या कुटुंबियांचे फडणवीस यांनी सांत्वन केलं आणि त्यांना मदतसामुग्रीचे वाटप सुद्धा केलं.


याठिकाणी पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज याठिकाणी हे लोक शिबिरात राहत असले तरी त्यांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनावर लक्ष केंद्रीत करून ते तातडीने करावे लागेल. सुरक्षित जागा शोधून त्यांना नवीन घरे बांधून द्यावी लागतील. पुनर्वसन करताना त्यांच्याशी सल्लामसलत करावी, अशी सूचनाही त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना केली. या नागरिकांना इतर मदत, विविध स्त्रोतांमधून पोहोचते आहे. पण पुनर्वसन हेच प्राधान्य असलं पाहिजे. यासाठी घरं आणि रोजगार असा साकल्याने विचार करावा लागेल. भविष्यात अशी दुर्घटना होऊ नये, याची सुद्धा काळजी घेण्याची गरज आहे, असं ते म्हणाले.


यानंतर शिद्रुकवाडी इथं सुद्धा त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला. घर, शेतीचे नुकसान, जनावरे वाहून गेली. त्यामुळे त्यांना आर्थिक सहाय्य तातडीने देण्याची गरज आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. इथं सुद्धा त्यांनी मदतसामुग्री वितरित केली. त्यानंतर कोयनानगर इथे स्थलांतरित कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या व्यथा देवेंद्र फडणवीस यांनी ऐकून घेतल्या. कायमस्वरुपी पुनर्वसन हीच मागणी येथे आश्रयाला असलेल्या शिबिरातील नागरिकांनी केली. सुमारे 150 कुटुंबांचा हा प्रश्न आहे. त्यांना सातत्याने अडचणींना तोंड द्यावे लागते आहे. हे नागरिक म्हणतात की, कोणतेही संकट आले की महिनाभर मदत होते. पण पुन्हा समस्या आहे तशाच राहतात. सरदार सरोवर प्रकल्पाच्या धर्तीवर पुनर्वसन व्हावे, ही त्यांची मागणी आहे. आतातर दरडी कोसळण्यामुळे पुन्हा गावात जाण्याचा मार्गच शिल्लक उरलेला नाही, असे गावकरी सांगतात. त्यामुळे तात्पुरते निवारे उभारणे, त्यासाठी कोयनेचे क्वार्टर्स वापरण्यात यावेत, अशा त्यांच्या मागण्या आहेत. हा प्रश्न सुटेपर्यंत आम्ही पाठपुरावा करीत राहू, असे त्यांनी आश्र्वस्त केलं.


पाटण तालुक्यातील हुंबरळी इथं सुद्धा अतिवृष्टीग्रस्त भागात पाहणी केली. दरड कोसळण्याने येथे काही घरे उध्वस्त झाली आहेत. लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांना तातडीने मदत दिली पाहिजे. लोकांमध्ये दुःख आहे, निराशा आहे आणि त्यांना अपेक्षा सुद्धा आहेत. आता जागा निश्चित करून युद्धस्तरावर पुनर्वसनाचा विचार केला पाहिजे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.