दीपक भातुसे, रायगड : विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची ते पाहणी करत आहेत. यावेळी झी २४ तास सोबत बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीसांनी म्हटलं की, विरोधी पक्ष म्हणून आमची जबाबदारी लोकांच्या मागण्या मांडून जास्तीत जास्त मदत मिळवून द्यावी ही आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं होतं की, 'मी बारामतीसारख्या दुष्काळी भागातून येतो. देवेंद्र फडणवीस विदर्भातून येतात. समुद्राशी काहीही संबंध नाही. त्यामुळे ते येत आहेत तर चांगलं आहे. प्रत्येकाला ही परिस्थिती समजेल, ज्ञानात भर पडेल.' त्यावर बोलताना फडणवीसांनी म्हटलं की,  मी अनेक वेळा बारामतीला गेलो तिथे समुद्र पाहिला नाही. मी असं कधीच ऐकलं नाही की बीसीसीआयचा चेअरमन व्हायला सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर यांना प्रशिक्षण द्यावं लागतं. पवार साहेब माझ्या वडीलांच्या वयाचे आहेत, माझे वडील जिवंत असते जर याच वयाचे असते. प्रत्येक बापाला असं वाटतं आपल्या पोराला कमी समजतं आणि आपल्याला जास्त समजतं, तो वडीलकीचा सल्ला असतो.'


फडवीसांनी म्हटलं की, मला यात दुसरी शंका येते की, माझ्या खांद्यावर बंदुक ठेवून वांद्रयाचे सिनियर आणि बारामतीचे ज्युनिअर यांना इशारा देण्याचा प्रयत्न आहे. या वयात पवार साहेबांना फिरावं लागतं, इतर कुणी लक्ष द्यायला तयार नाही, फिरायला तयार नाही, त्याकरता हा इशारा आहे शिका काही तरी यातून. चक्रीवादळ झालं तेव्हा भाजपचे लोक पहिले या ठिकाणी आले. प्रविण दरेकर आले म्हणून इतर जण घाईघाईत आले.


सर्कशीत आता सगळे विदुशक 


फडणवीसांनी यावेळी पवारांच्या टीकेला ही उत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, शरद पवारांचा सर्कसचा टच हल्ली सुटलेला आहे, त्यामुळे त्यांना हे माहित नाही की गेल्या १५ वर्षात सर्कसमध्ये प्राण्यांवर बंदी आहे. सर्कलमध्ये विदुषकच असतात, विदुषकच सर्कस चालवतात, राजनाथ सिंह यांना हे माहित असल्याने त्यांनी हे विधान केलं.


राजनाथसिंह यांनी महाराष्ट्रात सध्या सर्कस सुरू असल्याची टीका केली होती. त्यानंतर आरोप-प्रत्यारोपाचे वादळ उठले. राजनाथसिंह यांच्या या टीकेला उत्तर देताना पवार यांनी कोकण दौऱ्यावेळी 'महाराष्ट्रात सर्कस आहे. त्यामध्ये प्राणी आहेत. फक्त विदूषकाची कमतरता आहे.' अशी बोचरी टीका भाजपवर केली होती. त्यानंतर आज कोकण दौऱ्यावर आलेल्या फडणवीसांनी यावर उत्तर दिलं आहे. 


काँग्रेसला टोमणा


महाविकासआघाडीत काँग्रेस सध्या नाराज आहे. त्यावर देखील फडणवीसांना प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, निर्णय प्रक्रियेत सहभाग मिळत नाही की अन्य कशात भाग आणि हिस्से हवे होते ते मिळत नाही म्हणून ही नाराजी आहे याची मला कल्पना नाही. पण आता वाद करण्याची वेळ नाही. कोरोनाच्या, चक्रीवादळाच्या संकटात मुख्यमंत्र्यांनी तीनही पक्षात समन्वय साधला पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांना दररोज दोन पत्र लिहून सूचना करतो, पण त्या पत्राला उत्तर येत नाही.


राज्यपालांवरील विधानावरुन पवारांना टोला


पवारांनी राज्यपालांबाबत केलेल्या विधानावरुनही फडणवीसांनी पवारांना टोला दिला आहे. त्यांनी म्हटलं की, 'ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि आपल्या युनिव्हर्सिटीची तुलना होऊ शकते का? ऑक्सफर्ड आणि आपल्या युनिव्हर्सिटीच्या डिग्रीची तुलना होऊ शकते का?. परीक्षेबाबत राज्यपालांनी निर्णय घेतलेला नाही, कुलगुरूंची समिती नेमली होती त्यांनी सुचवलंय परीक्षा कशी घ्यायची. सरकारला परीक्षा घ्यायची नसेल तर त्यांनी राज्यपालांशी चर्चा करायला हवी. पण कुणीतरी परीक्षा न घेण्याची आधीच घोषणा करून टाकायची. राज्यपालांचे कुलपती म्हणून काही संवैधानिक अधिकार आहेत. इंजिनिअरिंग, मेडिकलच्या परीक्षा होणार, पण ५० टक्के विद्यार्थिंना एटीकेटी आहे त्यांचे तुम्ही काय करणार? परीक्षा रद्द कुणाच्या होणार याचा खुलासा होत नाही. सरकारने राज्यपालांशी समन्वय ठेवून याबाबतचा संभ्रम दूर करायला हवा.'