मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता राजकीय घमासान सुरू झालं आहे. त्यांच्या वादग्रस्त विधानानंतर आता राजकीय प्रतिक्रिया येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचं समर्थन करणं योग्य नाही असं म्हटलं आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्या विधानाशी सहमत नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. 


उपमुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?


मुंबईसह महाराष्ट्राच्या जडणघडणीत मराठी माणसाचे योगदान मोठं आहे. अन्य समाजांनीही योगदान दिलं आहे, मात्र मराठी माणसाचा योगदान यामध्ये सर्वात जास्त आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर त्यांची बदली होणार का? या प्रश्नावर बोलणं मात्र त्यांनी टाळलं.


या वक्तव्याबाबत अधिक भूमिका हे राज्यपाल व्यक्त करतील असं त्यांनी सांगितले. अतिशयोक्ती अलंकारातून असं वक्तव्य होऊ शकतं असं ही फडणीसांनी यावेळी स्पष्ट केलं.


राज्यपाल कोश्यारींचं स्पष्टीकरण


या सगळ्या प्रकारानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अखेर आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाचं योगदान सर्वाधिक आहे असं कोश्यारींनी म्हटलंय. मराठी माणसाचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता असं कोश्यारी म्हणाले. मात्र आपल्या विधानाचा विपर्यास केला गेला असंही त्यांनी म्हटलं आहे.