ताईंना मुख्यमंत्री करण्याचा शरद पवारांचा प्लॅन?
महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरेंनाच पाच वर्ष मुख्यमंत्री कसं ठेवणार असं म्हणत शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केलाय.
Maharashtra Assembly Election 2024 : महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरेंनाच पाच वर्ष मुख्यमंत्री कसं ठेवणार असं म्हणत शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एका मोठ्या नेत्यानं याबाबत माहिती दिल्याचा दावा त्यांनी केलाय. झी २४तासच्या टू द पॉईंट मुलाखतीमध्ये त्यांनी हा गौप्यस्फोट केलाय.
दरम्यान खासदार संजय राऊत यांनी त्यांचा हा दावा फेटाळून लावलाय. शरद पवार यांनी 5 वर्ष मुख्यमंत्रीपद टिकवण्याची कमिटमेंट केली होती असं खासदार संजय राऊत यांनी सांगीतलं.
मविआत मुख्यमंत्रिपदावरुन स्पर्धा
महाविकास आघाडी सरकारच्या काळात शरद पवार यांचा मुख्यमंत्रीपदावर डोळा होता असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांना दिलेल्या टू द पॉईंट या विशेष मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी हा दावा केलाय. मविआच्या एका बड्या नेत्याच्या म्हणण्यानुसार पवार ठाकरेंना सलग 5 वर्ष मुख्यमंत्रीपदी ठेवण्यास उत्सुक नव्हते असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
आता देखील शरद पवार यांना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचाच मुख्यमंत्री करायचा असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. काँग्रेस आणि शरद पवार यांना आपापला मुख्यमंत्री खुर्चीत बसवायचा असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.
संजय राऊत काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीसांनी केलेले आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं फेटाळलेत. भाजपनं मुख्यमंत्रीपद नाकारल्यानं नाईलाजानं उद्धव ठाकरेंनी मविआसोबत गेल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. काँग्रेस आणि शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना पाच वर्ष मुख्यमंत्रिपदाची हमी दिल्याचा दावाही संजय राऊतांनी केलाय.
सत्ता आल्यास मविआमध्ये मुख्यमंत्रीपदावरून गोंधळ होणार
काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मुख्यमंत्रिपदाची लालसा नाही असं नाही. त्यामुळेच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केलं नाही. निवडणूक निकालानंतर जर बहुमत मिळालं तर मविआत मुख्यमंत्रीपदावरुन यादवी माजणार असं आताच महायुतीचे नेते पैजेवर सांगू लागलेत.