Maharashtra Karnataka Border Dispute : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा पेटला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील सीमाभागांतील गावांवर केलेल्या दाव्यानंतर राजकारण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर सीमा भागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवली होती (Chandrakant Patil Shambhuraj Desai Belagavi visit). यानंतर हे दोन्ही मंत्री बेळगावला जाणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता हा दौरा रद्द झाल्याची माहिती पुढे येत आहे. याबाबत बोलताना उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सोलापूर, अक्कलकोटसह महाराष्ट्रातील 42 गावांवर दावा केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हे दोन मंत्री बेळगावमध्ये जाऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची भेट घेणार होते. मात्र बोम्मई यांनी सीमाभागातील गावांमध्ये तणावाचे वातावरण असल्याने महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आता हा दौराच रद्द करण्यात आल्याची चर्चा सुरु झाली आहे. याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.


सर्वोच्च न्यायालयातून न्याय मिळेल यावर विश्वास ठेवायला हवा - देवेंद्र फडणवीस


"या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्यामुळे याबाबत कर्नाटक किंवा महाराष्ट्र निर्णय घेऊ शकत नाही. सगळा निर्णय सर्वोच्च न्यायलय घेणार आहे. या संदर्भात नव्याने वाद तयार करणं योग्य होणार नाही. महाराष्ट्राने ताकदीने आपली बाजू मांडली आहे त्यामुळे आपल्याला सर्वोच्च न्यायालयातून न्याय मिळेल यावर विश्वास ठेवायला हवा, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.


"त्या ठिकाणी जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही"


"मंत्र्यांचा दौरा महापरिनिर्वान दिनानिमित्त होता. यासंदर्भात कर्नाटकचे काही म्हणणे आहे. मंत्र्यांनी ठरवले तर त्यांना जाण्यापसून कोणी रोखू शकत नाही. पण महापरिनिर्वाण दिनी अशा प्रकारचा वाद तयार करायचा का हा महत्त्वाचा विषय आहे. यासंदर्भातील विचार करुन मुख्यमंत्री निर्णय देतील. आपल्याला भविष्यात त्या ठिकाणी जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही. कोणीही घाबरत देखील नाही. त्या दिवशी महापरिनिर्वाण दिन असल्याने काय करावं याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील," असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.