वीजबिलावरून मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांना टोला...
`सरकारला असहकार करा... वीज बील भरू नका... अशी वक्तव्य मोठ्या नेत्यानं करणं म्हणजे आश्चर्याची बाब आहे... पण, चुकीची विधाने मोठ्या व्यक्तींनी केली तर रिस्पॉन्स मिळत नाही` अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांना टोला हाणलाय.
नागपूर : 'सरकारला असहकार करा... वीज बील भरू नका... अशी वक्तव्य मोठ्या नेत्यानं करणं म्हणजे आश्चर्याची बाब आहे... पण, चुकीची विधाने मोठ्या व्यक्तींनी केली तर रिस्पॉन्स मिळत नाही' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांना टोला हाणलाय.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी शेतकऱ्यांना आणि नागरिकांना वीजबिल न भरण्याचे आवाहन केले आहे... तसंच विरोधी पक्ष सरकार विरोधात राज्यभर मोर्चे काढत आहेत. त्यावर मुख्यमंत्र्यांनी शेलक्या शब्दांत प्रतिक्रिया दिलीय.
'आमच्या विरोधात विरोधक मोर्चे काढत आहेत. मात्र राज्याची जनता सुज्ञ आहे. त्यांना माहीत आहे की आम्ही किती निर्णय घेतले आहेत ते... ४८ लाख शेतकऱ्यांचे पैसे बँकांकडे दिले आहेत... नवीन यादी मिळेल तेव्हा पाच लाख शेतकरी यामध्ये समाविष्ट झालेले असतील', असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलंय. झोपडीधारकांना दिलासा देणारं विधेयक मंजूर करण्यात आल्याचा पुनरुच्चारही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला.
काय म्हटलं होतं पवारांनी...
१३ डिसेंबर रोजी आपल्या वाढदिवशी 'सरकारशी असहकार करा' असं आवाहन करत पवारांनी उपस्थित जमावाशी संवाद साधला होता. 'इतकी शक्ती तुम्ही इथे जमा केली आहे. आता प्रत्येकाने गावात जाऊन घरा-घरात सांगा की सरकारचा कोणताही कर भरू नका, वीज बिल भरु नका, आमच्या शेतीकर्जाचे पैसे न भरणाऱ्या सरकार बरोबर पूर्ण असहकार करा' असं पवारांनी यावेळी म्हटलं होतं.
नागपूरच्या हिवाळी अधिवेशाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्षांनी संयुक्तपणाने पदयात्रा मोर्चा आयोजित केला होता. राष्ट्रवादी कॉंग्रसने १० दिवस यवतमाळ ते नागपूर पदयात्रा मोर्चा काढून सरकारच्या विरोधात हल्लाबोल आंदोलन केलं होतं. बुटीबोरीकडून चालत येत काँग्रेसच्या मोर्चाशी राष्ट्रवादीचा मोर्चा मिसळला. या मोर्चामध्ये शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष रिपब्लिकन पार्टीचे कावडे व गवई गट असे सारे विरोधी पक्ष सहभागी झाले होते.