`असल्या फालतू गोष्टींना मी..`, फडणवीस असं का म्हणाले? असा कोणता प्रश्न विचारला गेला?
Devendra Fadnavis Comment: देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अनेक प्रश्नांना उत्तर दिली. मात्र एक प्रश्न ऐकल्यानंतर फडणवीस काहीश्या चिडलेल्या स्वरातच व्यक्त झाले. नेमकं काय घडलं अन् फडणवीस कोणत्या प्रश्नावर हे असे व्यक्त झाले जाणून घ्या.
Devendra Fadnavis Comment: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळेस फडणवीस यांनी अगदी डोंबिवलीमधील कंपनीला लागलेल्या आगीच्या मुद्द्यापासून ते पुण्यातील पोर्शे कारच्या अपघातासंदर्भात काँग्रेसचे नेते रविंद्र धंगेकर यांनी केलेल्या आंदोलनावरही प्रतिक्रिया नोंदवली. मात्र एक प्रश्न ऐकल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी, ''हे पाहा असल्या फालतु गोष्टींना मी उत्तर देत नाही,' असं म्हटलं.
पुणे प्रकरणावर फडणवीस काय म्हणाले?
फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळेस आधी त्यांना काँग्रेसचे नेते धंगेकर यांनी पुण्यातील आयुक्तालयासमोर केलेल्या आंदोलनावरुन प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना, "याचं राजकीयकरण करण्याचा प्रयत्न त्यांचा चालला आहे. यासंदर्भात जी काही कारवाई केली पाहिजे ती पोलिसांनी उघडपणे केली आहे. बालन्याय मंडळाने जो चुकीचा निर्णय दिलेला वरच्या कोर्टात जाऊन निर्णय सुद्धा बदलला आहे. पबचे मालक, मुलाचे वडील यांनाही अटक झालेली आहे. अतीशय कठोर कारवाई झालेली आहे. प्रत्येक गोष्टीचं राजकीयकरण करण्याचा जो काही उद्योग चालला आहे हे योग्य नाही," असं फडणवीस म्हणाले.
फडणवीस यांना नेमका कोणता प्रश्न विचारण्यात आला?
यानंतर पत्रकारांनी शालेय अभ्यासक्रमामध्ये मनाचे श्लोक अन् मनुस्मृतीचा समावेश केल्याच्या मुद्द्यावरुन काँग्रेसने टीका केली आहे. याच टीकेचा संदर्भ देत फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते चिडल्याच पाहायला मिळालं. फडणीस यांनी, 'हे पाहा असल्या फालतु गोष्टींना मी उत्तर देत नाही. मला असं वाटतं हल्लीच्या काळात त्यांना उद्योग उरलेले नाहीत. वाटेल तसे बोलायचे उद्योग सुरु आहेत. मनाचे श्लोक हे या महाराष्ट्रामध्ये वर्षानूवर्ष म्हटले जातात, ऐकले जातात, बोलले जातात. आता ते अभ्यासक्रमात आहे की नाही हे मला माहिती नाही. मी ते तपासलेले नाही. एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की विनाकारण संभ्रम तयार करायचा प्रयत्न चुकीचा आहे,' असं उत्तर दिलं.
नक्की वाचा >> धंगेकरांनी शेअर केला पबमध्ये पार्टी करणाऱ्या पुणे पोलिसांचा फोटो; फडणवीसांचं नाव घेत म्हणाले, 'आजपासून मी तुम्हाला..'
काँग्रेस आणि शरद पवार गटाचा आक्षेप
मनुस्मृतीचा समावेश अभ्यासक्रमात करण्याच्या प्रस्तावाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी जोरदार आक्षेप घेतला आहे. मनुस्मृतीतील श्लोक अभ्यासक्रमात खपवून घेणार नाही असा इशारा नाना पटोलेंनी दिला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया नोंदवताना, शालेय पुस्तकाचे रिराईट करण्याची बातमी चिंताजनक असल्याचं म्हटलं आहे. "यावरून राज्य सरकारची मानसिकता कळतेय. याबाबत शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांनी लक्ष घालावं," असं शरद पवार म्हणाले आहेत.