धंगेकरांनी शेअर केला पबमध्ये पार्टी करणाऱ्या पुणे पोलिसांचा फोटो; फडणवीसांचं नाव घेत म्हणाले, 'आजपासून मी तुम्हाला..'

Ravindra Dhangekar Pune Police Party Photos: रविंद्र धंगेकर यांनी आज पुणे पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलन करत पोलिसांवर गंभीर आरोप केल्यानंतर थेट पुणे पोलिसांचे पबमधील फोटो शेअर करत देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 24, 2024, 02:34 PM IST
धंगेकरांनी शेअर केला पबमध्ये पार्टी करणाऱ्या पुणे पोलिसांचा फोटो; फडणवीसांचं नाव घेत म्हणाले, 'आजपासून मी तुम्हाला..' title=
धंगेकरांनी आपल्या एक्स खात्यावरुन पोस्ट केला फोटो

Ravindra Dhangekar Pune Police Party Photos: पुण्यातील कल्याणी नगरमध्ये झालेल्या पोर्शे गाडीच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाची देशभरामध्ये चर्चा सुरु असतानाच आता या प्रकरणावरुन पुण्यातील राजकारणही चांगलेच तापले आहे. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज पुणे पोलीस आयुक्तालयाबाहेर आंदोलन करत पुणे पोलीस आयुक्तांना निलंबित करण्याची मागणी केली. पुणे पोलिस आयुक्तांनी पैसे घेतल्याचा गंभीर आरोप धंगेकरांनी केला. धंगेकर एवढ्यावरच थांबलेले नाहीत तर त्यांनी आता आपल्या एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन एक फोटो शेअर करत धक्कादायक खुलासा केला आहे.

"आजपासून मी तुम्हाला दररोज एका..."

"राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो, कल्याणी नगर अपघातानंतर तपासात अक्षम्य चुका होऊन देखील पुणे शहराचे पोलीस कमिश्नर अमितेश कुमार यांना अजूनही कोणी दोषी आहेत असे वाटत नाही. अर्थात जो स्वतःच बिल्डरच्या पाकिटावर काम करतोय तो कसा कुणावर कारवाई करणार?" असं म्हणत टीका केली आहे. तसेच धंगेकर यांनी, "असो, आजपासून मी तुम्हाला दररोज एका पोलीस स्टेशनवर सुरू असलेल्या गैरकारभाराची कथा पाठवणार आहे," असं म्हणत एक फोटो पोस्ट केला आहे.

तिघेच चालवतात पोलीस स्टेशन

धंगेकर यांनी रोज एका दिवशी एका पोलीस स्टेशनमधील गैरकारभाराचा खुलासा करण्याचा दावा करत आजच्या पहिल्या दिवशी मुंढवा पोलीस स्टेशनमधील एक फोटो पोस्ट करत असल्याचं म्हटलं आहे. "मुंढवा पोलीस स्टेशन हे अवघे 3 कर्मचारी चालवतात. त्यापैकी निलेश पालवे, काळे हे कॉन्स्टेबल सर्व पब्स, हॉटेल येथून हप्ते गोळा करण्याचे काम करतात," असा गंभीर आऱोप धंगेकरांनी केला आहे.

नक्की वाचा >> Pune Accident: नाश्त्यात अंड, 1 तास TV, 2 तास खेळ अन् दुपारी..; अल्पवयीन मुलाचा बालसुधारगृहातील दिनक्रम

फोटोही केला पोस्ट

"सोबत एक फोटो जोडत आहे ज्यात हे वसुली कॉन्स्टेबल वॉटर्स नावाच्या पबमध्ये पार्टी करतांना दिसून येत आहेत," असंही धंगेकर म्हणालेत. "आम्हा पुणेकरांच्यावतीने आपणांस विनंती आहे की, पुणे बिघडविणाऱ्या या पोलीस कॉन्स्टेबलची तातडीने चौकशी करत यांना निलंबित करा, अन्यथा 48 तासात यांचे इतर व्हिडिओ देखील असेच ट्विट करण्यात येतील," असा इशाराच धंगेकरांनी दिला आहे. आपल्या पोस्टच्या शेवटी धंगेकरांनी, "पुन्हा भेटुयात नव्या पोलीस स्टेशनचा ग्राउंड रिपोर्ट घेऊन," असं म्हणत लवकरच अधिक गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा दिला आहे.

हलगर्जीपणा दाखवल्याचा आरोप

पुणे पोलीस आयुक्तालयासमोरील आजच्या आंदोलनादरम्यान धंगेकरांनी, पुणे पोलिसांनी कल्याणी नगर पोर्शे अपघात प्रकरणात कमालीचा हलगर्जीपणा दाखवला असून बिल्डर कुटुंबाच्या पैशाच्या पाकिटाखाली पोलीस दबले गेले आहेत, असा आरोप त्यांनी केला.