पुणे : 'दैनिक सामनामध्ये आमच्याबद्दल चांगलं कधी काही लिहिलं गेलं आहे का? चांगलं लिहायला ते काय आमचे हितचिंतक आहेत का?' असा प्रश्न विचारत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय राज्यमंत्रीपदी नियुक्ती हा पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा डाव आहे, असा घणाघाती आरोप शिवसेनेने मुखपत्र सामनामध्ये केला होता. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधण्याची संधीही देवेंद्र फडणवीस यांनी सोडली नाही. 'संजय राऊत यांना सर्व गोष्टी माहित आहेत, असं का वाटतं तुम्हाला, तुमचा असा का गैरसमज आहे की ते पंडित आहेत, त्यांना संविधान समजतं' संजय राऊत हे सर्वज्ञ आहेत असं तुम्हाला वाटतं, पण ते खरं नाही, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे. 


केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे नाराज असल्याच्या चर्चेवरही फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. 'भागवत कराड आणि मी दोघंही गोपीनाथ मुंडे साहेबांनी तयार केलेलं नेतृत्व आहे. भाजपमध्ये 'याला' केल्याने 'याला' संपवायचं, असं काहीही नसतं. त्यामुळे भागवत कराड यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर जितका आनंद पक्षातील इतर कार्यकर्त्यांना किंवा मला झाला असेल त्यापेक्षा जास्त आनंद हा पंकजा मुंडे यांना झाला असेल, कारण भागवत कराड हे मुंडे परिवारातील आहेत', असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 


कपोलकल्पित आरोप लावून आमच्या बारा आमदारांना निलंबित करण्यात आलं. ओबीसींच्या प्रश्नावर आम्ही सरकारला उघडं पाडलं म्हणून त्यांनी आमचे आमदार निलंबित केले असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला. लोकशाहीला फासावर चढवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर महाविकास आघाडी सरकारने केलं आहे. ओबीसींची इम्पेरिकल डेटा महाविकास आघाडी सरकारला देणे शक्य होतं पण त्यांनी तो दिला नाही वेळकाढूपणा केला त्यामुळे ओबीसींचं आरक्षण रद्द झाल्याची टीकाही फडणवीस यांनी केली.