फडणवीस यांनी अन्वय नाईक प्रकरण दाबले, खासगी गुन्हेगारीविरोधात कारवाई - सचिन सावंत
अभिनेता सुशांतसिंह प्रकरणात काही पुरावे नसताना चौकशी होते, इथे तर सुसाईड नोट आहे. त्यांचे नाव आहे. तसेच हे सगळे खासगी गुन्हेगारी स्वरुपाचे आहे. २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण दाबले, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह प्रकरणात काही पुरावे नसताना चौकशी होते, इथे तर सुसाईड नोट आहे. त्यांचे नाव आहे. तसेच हे सगळे खासगी गुन्हेगारी स्वरुपाचे आहे. २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण दाबले, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला. आम्ही विरोधी पक्षात असताना हे बघितले आहे. विरोधी पक्ष असूनही आम्हालाही उडवाउडवीची उत्तरे दिली. नाईक कुटुंबावर प्रचंड दहशत होती. दोन वर्ष हा परिवार संघर्ष करत होता. दोन वर्षानंतर अन्वय नाईक आणि त्यांच्या परिवाराला न्याय मिळाला आहे. ही कारवाई दिवंगत अन्वय नाईक यांना श्रद्धांजली आहे, असे ते यावेळी म्हणाले.
सुसाईड नोट असूनही चौकशी का नाही?
देवेंद्र फडणवीस यांच्या काळात दोन वर्ष चौकशी झाली नाही. अन्वय नाईक यांना न्याय का मिळाला नाही? एकाच देशात दोन न्याय कसे?, ही व्यक्ती भाजपचा अजेंडा चालवते आहे. भाजप सोडता विरोधकांवर तुटून पडते. याला काय म्हणायचे. जी कारवाई झाली आहे, ती न्यायालयाच्या निर्णयानुसार झाली आहे. सुसाईड नोट असूनही चौकशी का झालेली नाही. मला आश्चर्य वाटतंय भाजपचे नेते आणि देशाचे गृहमंत्री यांच्याकडून असे वक्तव्य येते, ज्यात अन्वय नाईक यांच्या परिवाराच्या संघर्षाबद्दल उल्लेख नसतो.- नाईक यांनी सुसाईड नोट मध्ये कारण स्पष्ट केले आहे. देशात कुठलं राज्य आहे जिथे सुसाईड नोटमध्ये नावं असूनही चौकशी होत नाही, कारवाई होत नाही, असे थेट सवाल सचिन सावंत यांनी भाजपला विचारला आहे.
'फडणवीस यांनी हे प्रकरण दाबले'
न्याय मिळण्यासाठी दोन वर्ष हा परिवार संघर्ष करत होता. अन्वय नाईक यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या परिवाराला न्याय मिळत नसेल तर त्यांना काय यातना झाल्या असतील, याचा विचार करा.- मला आश्चर्य वाटतंय भाजपचे नेते आणि गृहमंत्री यांच्याकडून असं वक्तव्य येतं ज्यात अन्वय नाईक यांच्या परिवाराच्या संघर्षाबद्दल उल्लेख नसतो. २०१८ साली फडणवीस यांनी हे प्रकरण दाबले. पोलीस सांगत होते ज्याच्यावर तुम्ही आरोप करताय ते पॉवरफूल आहेत, त्यांच्यामागे मोठमोठे लोक आहेत. सुसाईड नोटमध्ये नाव असताना तेव्हा अर्णब गोस्वामी यांना चौकशीसाठी साधं अलिबागला बोलवले नाही. त्यांचा जबाब मुंबईत नोंदवून घेण्यात आला. एवढे का पाठीशी घातलं जात होते त्याचं उत्तर फडणवीस यांनी दिलं पाहिजे, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
एका देशात दोन कायदे आहेत का?
सुशांतसिंह प्रकरणात काही पुरावे नसताना चौकशी होते, इथे तर सुसाईड नोट आहे. नाईक यांचा परिवार मागणी करत होता चौकशीची मग त्याची चौकशी व्हायला नको का? सुशांतसिंह प्रकरणात त्यांच्या वडिलांनी मागणी केली तर चौकशी केली, मग नाईक प्रकरणी का नाही. एका देशात दोन कायदे आहेत का? आणि गृहमंत्री अमित शाह ट्विट करतात. एका मराठी कुटुंबाला उध्वस्त करण्यात आले आहे. आज राज्यातील भाजपचे नेते अर्णबचे समर्थन करतायत, त्यांनी सुसाईड नोट वाचावी. आज एका मराठी कुटुंबाला न्याय मिळत असेल तर त्याचे समाधान आहे, असे सचिन सावंत यांनी सांगितले.
का झाली अटक?
दरम्यान, अन्वय नाईक यांनी रिपब्लिकन वाहिनीसाठीच्या स्टुडिओचे काम केले होते. स्टुडीओच्या इंटेरियर डिझाईनच्या कामाची जबबाबदारी त्यांच्यावर होती. यासाठी ५ कोटी ४० लाख इतके बिल अर्णब गोस्वामी यांच्याकडून येणे होते. पण, वारंवार बिल मागूनही गोस्वामींकडून बिलाची रक्कम दिली गेली नाही. त्यामुळे मानसिक तणावाखाली अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी नाईक यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्या आत्महत्येस अर्णब यांना जबाबदार धरले होते. तसेच त्यांच्या आईने देखील आत्महत्या केली आहे. या घटनेसंदर्भात अन्वय नाईक यांच्या पत्नीने तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. रायगड पोलिसांकडून कलम ३०६ अन्वये गोस्वामी यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.