जालना: छत्रपतींच्या गादीचा मान मुख्यमंत्री पदापेक्षाही मोठा आहे. मात्र, आपल्या दुर्दैवाने राजे पंतांना जाऊन मिळाले, असा खोचक टोला विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपला लगावला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार टीकाही केली होती.


यानंतर गुरुवारी नाशिकमध्ये झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवेळी उदयनराजेंना व्यासपीठावर स्थान देण्यात आले होते. मोदींनी आपल्या भाषणात त्यांचा आवर्जून उल्लेखही केला होता. 


धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी जालन्यातील सभेत उदयनराजेंचा समाचार घेतला. राजेंचा पक्षप्रवेश हा पंतप्रधानांच्या हस्ते होणार होता. पण ऐनवेळी तो अमित शहांच्या उपस्थितीत पार पडला. नाशिकच्या सभेत मोदींचं स्वागत करतानाही राजे १०व्या क्रमांकाच्या रांगेत उभे होते. छत्रपतींच्या गादीचा मान मुख्यमंत्री पदापेक्षाही मोठा आहे. मात्र, आपल्या दुर्दैवाने राजे पंतांना जाऊन मिळाले, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले. 


राष्ट्रवादीतून गेल्या काही दिवसांत राजे गेले, सेनापती गेले, सरदार गेले, कावळे गेले. मात्र, लाखो कार्यकर्ते राष्ट्रवादीत आहेत तोपर्यंत शरद पवारांचा पुरोगामी विचार कधीच संपणार नाही, असे धनंजय मुंडे यांनी ठणकावून सांगितले. तसेच शिवाजी महाराजांनंतर रयतेला अभिप्रेत रयतेचे राज्य फक्त शरद पवारांनी चालवले. दिल्लीत महाराष्ट्राची पत फक्त शरद पवारांमुळे असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.


याशिवाय, शरद पवार यांनी आतापर्यंत काय केले, असा सवाल विचारणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनादेखील मुंडे यांनी फटकारले. शरद पवारांनी त्यांच्या कार्यकाळात जितके विमानतळ उभारले तेवढी बसथांबेही अमित शहा यांना गुजरातमध्ये उभारता आले नसतील, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.