Dharashiv Loksabha : धाराशिवमध्ये महायुतीच्या उमेदवाराचा तिढा अखेर सुटला आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धाराशिवची जागा मिळाली आहे. मात्र या जागेवरुन भाजप आमदाराची पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणार आहे. धाराशिवमध्ये आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.  त्यामुळे धाराशिवमध्ये लोकसभेसाठी राष्ट्रवादीत हा मोठा पक्षप्रवेश होणार आहे. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून धाराशिव लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याचे म्हटलं जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात धाराशिवमध्ये लोकसभेच्या उमेदवारीसंदर्भात नाट्यमय घडामोडी घडणार आहे. अर्चना पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर राणा जगजितसिंह पाटील मात्र भाजपमध्येच राहणार आहेत. अशातच धाराशिव लोकसभेसाठी पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले निंबाळकर आणि पाटील कुटंबियांमध्ये सामना रंगणार आहे.


गेल्या काही दिवसांपासून धाराशिवच्या जागेसाठी तिन्ही मित्रपक्षांमध्ये बैठकांचे सत्र सुरु होतं. त्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्याचे निश्चित झालं. धाराशिवची जागा राष्ट्रवादीला मिळाल्याने धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चना पाटील यांना शिवाजी आढळराव पाटील यांच्याप्रमाणे पक्षप्रवेश देऊन उमेदवारी देण्यात येणार आहे. त्यामुळे आता धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अशी दिर भावजयीत लढत होणार आहे.


अर्चना पाटील यांची निवडणुकीसाठी जोरदार तयारी


उमेदवारीची अधिकृत घोषणा झाली नसली तर अर्चना पाटील या आधीच निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. अर्चना पाटील यांनी महिलांसाठी विविध उपक्रम घेत प्रचार सुरु केला होता. महिलांसाठी चित्रपट, धार्मिक - पर्यटनस्थळी सहली, मंगळागौरी स्पर्धा, हिरकणी महोत्सव, हळदी - कुंकू, होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करुन अर्चना पाटील राजकारणात सक्रीय झाल्या होत्या.