दुकान बंद न केल्याने महिला आंदोलकांची दगडफेक; धाराशिव बंदला हिंसक वळण
Maratha Reservation Protest Jalna : जालन्यात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर लाठीचार्ज केल्यानंतर राज्यात विविध ठिकाणी बंद पाळण्यात आला आहे. धाराशिवमध्येही याच्या निषेधार्थ बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार विविध ठिकाणी बंद पुकारण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर पतंगे, झी मीडिया, धाराशिव : जालना (Jalna Maratha Protest) येथील मराठा आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ राज्यभरात विविध ठिकाणी बंदचे आवाहन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी बंद पुकारून आंदोलन करण्यात येत आहे. मात्र धाराशिवमध्ये (Dharashiv) पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागल आहे. धाराशिव शहरात सुरू असलेल्या रॅलीमधील आक्रमक महिला पदाधिकाऱ्यांनी दुकानांवर दगडफेक केली आहे. त्यामुळे धाराशिवमध्ये वातावरण तापलं आहे.
धाराशिव शहरातील शम्स चौक, नगरपरिषद, धारासुर मर्दानी भागात ही दगडफेक करण्यात आली आहे. बंदचे आवाहन केल्यानंतरही काही दुकाने उघडी ठेवण्यात आली होती. यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी ही दगडफेक केली आहे. सध्या धाराशिव शहरात निषेदाची रॅली सुरू असून शहर वर तणावपूर्ण वातावरण आहे. यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला असून आंदोलन करताना शांत करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान नागरिकांनी शांततेत राहावे असे आवाहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आहे.
जालना जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर शुक्रवारी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर लाठीचार्ज करण्यात आला होता. यानंतर हे आंदोलन पेटलं होतं. शेजारच्या जिल्ह्यामध्येही या आंदोलनाचे लोण पेटलं आहे. मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्याने राज्यभरात बंदची हाक देण्यात आली आहे. त्यानुसार धाराशिव जिल्ह्यातील कळंब, तुळजापूर, उमरगा, लोहारा, भूम परंडा या प्रमुख शहरासह गावांमध्येही बंद पाळला जात आहे. मात्र आता महिलांना केलेल्या दगडफेकीमुळे बंदला हिंसक वळण लागलं आहे.
आंदोलनाचे पडसाद
पोलिसांनी लाठीचार्ज करुन हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आंदोलनकांनी केला आहे. पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा व्हिडीओसुद्धा समोर आला आहेत. पोलिसांनी शांततेत आंदोलन सुरु असताना लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली, असे मराठा आंदोलकांचं म्हणणं आहे. तर आधी दगडफेक सुरु झाली त्यामुळे आम्हाला लाठीचार्ज करावा लागला, असे स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात आलं आहे. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटत आहेत. छत्रपती संभाजी नगरमध्ये बसची जाळपोळही करण्यात आली आहे.
"धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन आहे की, इथल्या सगळ्या समाजामध्ये खेळीमेळीचे वातावरण आहे. जालनामध्ये जी घटना झाली त्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मराठा समाजाच्या लोकांना आवाहन आहे की शांततापूर्वक वातावरण ठेवावे. कोणत्याही गोष्टीचे नुकसान करु नका," असे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.