Bageshwar Maharaj On Maratha Aarakshan: आपल्या वक्तव्यांनी कायम चर्चेत असलेले बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) उर्फ बागेश्वर बाबांनी मराठा आरक्षणासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना मराठ्यांच्या इतिहासावर प्रकाश टाकला आहे. सोमवारी रामकथेचं वाचन करण्याच्या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनंगरमध्ये दाखल झालेल्या बागेश्वर बाबांना पत्रकारांनी तुम्ही मन की बात करण्यासाठी प्रसिद्ध आहात तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रात मागील काही काळापासून जोरदार मागणी होत आहे. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे का? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला बागेश्वर यांनी स्पष्ट शब्दांमध्ये उत्तर देत आपली भूमिका मांडली आहे.


मराठा आरक्षणावरुन तापलं वातावरण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रामध्ये मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापलेलं आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मागील काही महिन्यांमध्ये 2 वेळा मोठं आंदोलन उभं केलं. मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाच्या माध्यमातून मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटून आरक्षण जाहीर करावी या मागणीसाठी आंदोलन केलं. मात्र राज्यामध्ये सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदे सरकारने आरक्षणासंदर्भातील कायदेशीर अडचणी दूर करुन कायद्याच्या चौकटीत टिकेल असं आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगेंकडून वेळ मागून घेतला. मागील आठवड्यामध्ये झालेल्या चर्चेनुसार मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 2 महिन्यांचा वेळ दिला आहे. दिवाळी तसेच परीक्षांच्या पार्श्वभूमीवर आंदोलन मागे घेण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी मान्य करत सरकारला हवा असलेला वेळ दिला आहे.


बागेश्वर बाबा नेमकं काय म्हणाले?


बागेश्वर बाबांना याच विषयासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीला थेट पाठींबा दिला. इतकेच नाही तर त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मराठ्यांचा सर्वात मोठा वाटा असल्याचंही म्हटलं. "मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. मन की बात करणं वेगळी गोष्ट आहे आणि अधिकाराबद्दल बोलणं वेगळी गोष्ट आहे. मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. भारत गुलामगिरीमध्ये होता तेव्हा आपल्या शौर्याने आणि विरतेने भारताला गुलामगिरीमधून मुक्त करण्याचे उपकार मराठ्यांनी केलेत. भारताला स्वातंत्र्य करण्याचं सर्वाधिक श्रेय हे मराठ्यांनाच जातं. त्यामुळे मराठा सामजाला आरक्षण मिळालं पाहिजे," असं बागेश्वर बाबा म्हणाले.


भाविकांची गर्दी


छत्रपती संभाजीनगरमध्ये बागेश्वर धामचे पंडीत धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा सोमवारी दाखल झाले. संभाजीनगरमधील क्रांती चौकामधून भव्य कलश यात्रा काढण्यात आली. या कलशयात्रेसाठी हजारोंच्या संख्येनं भाविकांनी क्रांतीचौकामध्ये गर्दी केलेली. अयोध्यानगरीमधील मैदानावर श्रीराम कथेला सुरुवात केली.