धुळे-नंदुरबारमध्ये आदिवासी समाजाकडून कडकडीत बंद
खासदार डॉ. हिना गावीत यांच्या वाहनाची तोडफोड झालेबद्दल मराठा क्रांती मोर्चाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
धुळे: मराठा आंदोलनादरम्यान खासदार डॉ. हिना गावित यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आदिवासी समाज नाराज झाला आहे. त्यामुळे धुळे, नंदुरबार जिल्ह्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर काँग्रेस आमदार काशीराम पावरा यांच्या नेत्वृत्वात रास्तारोको आंदोलन करण्यात येत आहे. हजारो आदिवासी बांधव रस्त्यावर उतरले आहेत. डॉ. हिना गावित यांच्या वाहनावर हल्ला करणाऱ्यांना अटक करा अशी आंदोलकांची मागणी आहे.
उत्स्फूर्तपणे बंद
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील दहापैकी सुमारे आठ तालुके हे आदिवासीबहूल म्हणून ओळखले जातात. या तालुक्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. काँग्रेस आमदार काशीराम पावरा हे स्वत:ही आंदोलनात उतरले आहेत. बंदबहूल भागात साधी चहाची टपरीही सुरू नाही. सर्व बसेस बंद आहेत. विशेष असे की, या बंदसाठी कोणत्याही प्रकारे अवाहन करण्यात आले नाही. लोकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला आहे.
...म्हणून मराठा क्रांती मोर्चाने व्यक्त केली दिलगिरी!
दरम्यान, खासदार डॉ. हिना गावीत यांच्या वाहनाची तोडफोड झालेबद्दल मराठा क्रांती मोर्चाने दिलगिरी व्यक्त केली आहे. डॉ. गावीत यांच्या गाडीची तोडफोड करण्यामागे आरक्षणाशिवाय कुठलाही हेतु नाही, असे स्पष्ट करतांना आरक्षण मिळत नाही तोवर ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे धुळे जिल्हा समन्वयक मनोज मोरे यांनी दिला आहे. कुणालाही इजा पोहचवणं हा हेतु धुळे मराठा क्रांती मोर्चाचा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलंय.