प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : ही बातमी बनावट मद्य (fake liquor) निर्मितीचा गवगवा करण्यासाठी नव्हे तर नागरिकांनी सजग राहावं यासाठी सांगत आहोत. धुळ्यात (Dhule News) केवळ 25 रुपये खर्च करून बनवली गेलेलं विदेशी मद्य तब्बल 150 ते 180 रुपयांना विकले जात असल्याचे समोर आले आहे. मंगळवारी धुळे पोलिसांनी मोराणे गावात बनावट मद्य तयार करुन विक्री करण्यात येणारा अड्डा पोलिसांनी उदध्वस्त केला. दारू तयार करण्याचे साहित्य, बाटल्या असा 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत धुळे पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कसे तयार केले जाते बनावट विदेशी मद्य?


शेकडो लिटर विदेशी मद्य काहीश्याच साहित्यातून तयार करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.  48 छोट्या बॉटल्स बनावट विदेशी बनविण्यासाठी चार लिटर स्पिरिट, पाच लिटर फिल्टर पाणी, एक मोठा चमचा ईसेन्स, पुरेसा रंग आणि मालटा नावाचे एक रसायन लागत असल्याचे समोर आले आहे. 40 टक्के स्पिरीट आणि 60 टक्के पाण्याचा वापर करून ही बनावट दारू बनवली जाते. ही दारु मूळ विदेशी दारुसारखी बनली आहे की नाही हे तपासण्यासाठी त्याच ब्रॅंन्डची एक ओरिजनल बॉटल जवळ ठेवली जाते. त्यानंतर दोघांचा रंग तपासून पहिला जातो. रंग सारखा झाल्यानंतर त्याच कारखान्यातील एकजण बनावट दारूचा एक पॅग टेस्ट करून पाहतो. रंग, चव आणि वास सारखे वाटल्यानंतर 3 रुपये किलोप्रमाणे आणलेल्या भंगारच्या बॉटलमध्ये बनावट मद्य भरले जाते. 


ज्या ब्रँडच्या बॉटल असतील त्याच ब्रँडची बनावट दारू बनवली जाते. या बॉटलचे सील मध्यप्रदेश राज्यातून आणली जात असल्याचे समोर आले आहे. बॉटलमध्ये दारू भरल्यानंतर सिलबंद करून ही दारू ठोक विक्रीसाठी पाठवली जाते. 48 बाटल्यांचा एक बॉक्स बनवण्यासाठी केवळ 1200 रुपये खर्च येतो आहे. म्हणजे एका क्वार्टरसाठी 25 रुपये खर्च करुन ती 80 ते 100 रुपयांना विकली जाते. तर दुकानामध्ये हीच दारु 180 रुपयापर्यंत विकली जाते. आरोपींकडून 155 रुपये कमावण्यासाठी लोकांसोबत जीवघेणा खेळ सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.


दुसरीकडे ही बनावट दारू लग्नकार्य आणि ज्या ठिकाणी एकच वेळी मोठी मागणी असते त्या ग्रामीण भागात प्रामुख्याने विकली जाते. अनेक जण ही बनावट दारू हाताने बनवतात तर काही महाभाग यासाठी यत्रांचा वापर करतात. असुरक्षित आणि घातक पद्धतीने ही बनावट दारू बनवली जाते आणि स्वस्तात विकली जाते. त्यामुळे मद्यपींनी दारू पिण्या आधी ती खरी आहे की कुठल्या बनावट कारखान्यात तयार झाली आहे याची चौकशी करावी. अन्यथा ही बनावट दारू जीव घेणी ठरवू शकते.


"स्थानिक पातळीवर आरोपींकडून मद्याची विक्री केली जात होती. गर्दीचे ठिकाण, लग्नसराई असलेल्या ठिकाणी चोरट्या पद्धतीने बनावट दारु विकली जाते. 180 रुपयांची दारु केवळ 90 रुपयांत विकली जाते.  एका वेळी एक बॉक्स याप्रमाणे मद्याची विक्री केली जाते," अशी माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली आहे.