प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : धुळ्यातून (Dhule Crime) एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. धुळ्यात भाच्याच्या रडण्यामुळे त्रस्त झालेल्या मामाने धक्कादायक कृत्य केले आहे. भाच्याच्या रडण्यामुळे डोकं दुखत असल्यामुळे संतप्त झालेल्या मामानेच भाच्याला पाण्याच्या ड्रम मध्ये बुडून ठार मारलं आहे. पोलिसांनी (Dhule Police) आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. आरोपी मामाने आपणच भाच्याची हत्या केल्याची कबुली दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धुळे शहरातील फिरदोस नगर मध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. भाच्याच्या रडण्याच्या त्रासाला कंटाळून मामाने भाच्याला ड्रम मध्ये बुडून ठार मारले आहे. शहरातील फिरदोस नगर येथे आजोळी हा भाचा आला होता. अवघ्या चार वर्षांच्या मोहम्मद हाजीक एजाज अहमद असं मयत मुलाचे नाव आहे. जोरजोरात रडण्याच्या कारणावरून संतापलेल्या नूरुल अहमद याने भाचा मोहम्मद हजिकला पाण्याच्या ड्रममध्ये बुडून मारले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आपण मोहम्मद हाजीक एजाज अहमदला पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून मारल्याची कबुली नूरुल अहमद याने दिली. या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.


धुळ्यातील फिरदोस नगरमधील पीडित मुलाची आई माहेरी आली होती. त्यानंतर महिलेचा पती कामावर निघून गेला होता. महिलेचा लहान मुलगा हाजिक हुसैन व लहान भाऊ नुरूल अहमद नईम अहमद हे दोघे घरात खेळत होते. त्यावेळी आरोपी मामा आणि भाचा खेळत असतानाच मोहम्मद हाजीक एजाज हुसैन रडत होता. त्याच्या रडण्याच्या आवाजामुळे आरोपीला त्रास होऊ लागला. रागाच्या भरात त्याने लहानग्या भाच्याला पाण्याने भरलेल्या ड्रमध्ये बुडवले. अचानक मुलाचा आवाज बंद झाल्यामुळे त्याची आई काय झालं पाहायला गेली. महिलेला प्लास्टिक ड्रममध्ये मुलगा खाली डोकं वरती पाय अशा अवस्थेत आढळला. आईने तात्काळ मुलाला घेऊन सरकारी रुग्णालयात धाव घेतली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. पाण्यात बुडाल्याने मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.


पोलिसांनी काय सांगितले?


"संध्याकाळच्या सुमारास, मरिअम्मी एजाज शेख यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. माहेरी आलेली असताना भाऊ नूरुल अहमद याने हजिकला याला पाण्याच्या ड्रममध्ये बुडून मारले आहे. तक्रारीवरन आरोपीविरुद्ध भादवि 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे," अशी माहिती पोलीस निरीक्षक, धीरज महाजन यांनी दिली.